नागपूर : कोव्हिड-१९ विषाणूच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत ऑक्सिजसाठी धावपळ होऊ नये यासाठी नागपुरात हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारा प्रकल्प रुग्ण सेवेत रुजू होत आहे. मात्र, प्रकल्पात आता बंगालच्या उपसागरात उसळलेल्या चक्रीवादळानं अडथळा आणला आहे.

या प्लांटसाठी लागणारी उपकरणं खास इटलीवरून आयात केली गेली आहेत. ती समुद्री मार्गानं विशाखापट्टणमच्या बंदरावर येऊन पोहोचली. मात्र, चक्रीवादळामुळं सध्या हे उपमहासागर खवळलं आहे. त्यामुळं ही उपकरणे घेऊन आलेलं मालवाहू जहाज बंदरावर हेलकावे खात आहे. अशात जोपर्यंत वादळ शांत होत तोवर जहाजातून ही उपकरणं सुरक्षित बाहेर काढणं जोखमीचं झालं आहे.

इटलीहून आयात केलेल्या या उपकरणांमध्ये हवेतून शोषलेल्या वायूतले ऑक्सिजन वेगळं करणारी पाच एअर फिल्टर कॅसेट्स, शुद्ध ऑक्सिजन स्टोअर करण्यासाठी आलेले 4 रिझर्वायर टँकचा यात समावेश आहे. समुद्रातल्या वादळामुळं ही उपकरणं नागपुरात येण्यासाठी आणखी १५ दिवस वाट पहावी लागणार आहे. त्यामुळं डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्रात सुरू होणारा हा ऑक्सिजन प्रकल्प काही आठवड्यांसाठी रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी बंगालच्या पूर्व-मध्ये खाडीवर दिसलेलं सौम्य दबाव क्षेत्रानं रविवारी आपला दबाव थोडा वाढवला आहे. सोमवारी सकाळपर्यंत हा दबाव ‘चक्रीवादळात’ रुपांतरीत होऊ शकेल. २६ मे रोजी सायंकाळी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या तटांना हे चक्रीवादळ धडक देण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग १५५ ते १६५ किलोमीटर प्रती तास असू शकतो. तो १८५ किमी प्रती तासांपर्यंत वाढू शकतो. यामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here