: करोना विषाणूने (Coronavirus) जगभरात थैमान घातलं असून या विषाणूला हरवण्यासाठी सर्वत्र वैज्ञानिक मार्गांचा अवलंब करत लढा उभा केला जात आहे. मात्र भारतातील काही भागांमध्ये मात्र अंधश्रद्धेतून होमहवन आणि पूजाअर्चा यांसारख्या गोष्टी केल्या जात आहे. अशातच बेळगावमध्ये तर यापुढे जाऊन करोनाला रोखण्यासाठी चक्क देवाला एक घोडा सोडण्यात आला. तसंच धक्कादायक बाब म्हणजे या घोड्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचं स्पष्ट झालं आहे.

करोनाला हद्दपार करण्यासाठी चक्क देवाला सोडलेल्या घोड्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या अंत्यसंस्कारासाठी लॉकडाऊन असतानाही गावात मोठी गर्दी झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना जिल्ह्यातील व गोकाक तालुक्यातील कोन्नुर येथे घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बेळगाव जिल्ह्यात सध्या करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. विषाणूच्या संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र तरीही काही गावांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत गर्दी होत असल्याने संसर्ग वाढण्यास मदत होत आहे. गोकाक तालुक्यातील कोन्नुर या गावात तर शेकडो लोकांनी एका घोड्याच्या अंत्यसंस्काराला गर्दी केली आणि प्रशासनाचे सारे नियम धाब्यावर बसवले.

या बाबत अधिक माहिती अशी, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येथील एका मठातील देवासाठी घोडा सोडण्यात आला. हा घोडा पंढरपुरातून आणल्याचे समजते. पूर्वी मलेरिया आणि प्लेग यासारख्या साथीच्या रोगांचे निवारण होण्यासाठी देवाला घोडे सोडण्याची प्रथा होती. त्यानुसार करोना महामारीचे संकट निवारण्यासाठी मरडीमठात पवाडेश्वर महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी हा घोडा देवीला सोडण्यात आला होता. पण शनिवारी रात्री या घोड्याचे निधन झाले.

देवाला सोडलेल्या या घोड्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराची मोठी तयारी करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेला आणि अंत्यसंस्काराला शेकडो लोकांनी गर्दी केली. यावेळी लॉकडाऊनचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले. परिणामी या ठिकाणी उपस्थित असलेल्या १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरडीमठही १४ दिवसांसाठी लॉक करण्यात आला असून अंत्यसंस्कारात सहभागी असलेल्यांची रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here