‘अशोक चव्हाण यांनी आदर्श प्रकरणासाठी जेवढे वकील लावले होते तेवढे मराठा आरक्षणासाठी वकील लावले असते तर आज मराठ्यांना आरक्षण मिळाले असते,’ अशी खरमरीत टीका भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे.
नांदेडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत चिखलीकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका केली. ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरक्षणाचं क्रेडिट घेण्याच्या नादात आरक्षण गमावलं,’ असा आरोप यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला.
प्रताप पाटील चिखलीकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत काँग्रेसचे मातब्बर नेते अशोक चव्हाण यांचा नांदेडमध्ये पराभव केला. त्यानंतर आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी चव्हाण यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणावरून आगामी काही दिवसांत पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरात आज महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. संभाजीराजे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दौरा करून मराठा आरक्षण आंदोलनाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. या दौऱ्यानंतर आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारसाठी पुढील काही दिवस आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times