‘पीपीई किट न घालता रोहित पवारांनी रुग्णांसोबत डान्स केला. ते शरद पवार यांचे नातू आहेत, म्हणून रोहित पवारांना दुसरा न्याय का?’ असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवारांनी कोणतंही पीपीई किट घातलं नाही. त्यामुळे ते करोनाचे सुपर स्प्रेडर ठरू शकतात असंही प्रविण दरेकर म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगळा न्याय आणि ते शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय का? असा सवाल करत प्रविण दरेकरांनी यावर टीका केली आहे.
खरंतर, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला पवार यांनी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर दिला. त्यावेळी तेथे मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रुग्णांचे मनोबल वाढावे तसंच मनोरंजन व्हावे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता. कोविड सेंटरमध्ये सैराट चित्रपटातील गाणी लोकप्रिय आहेत. या गाण्यावर ८० वर्षांच्या आजींनीही झिंगाटच्या गाण्यावर ठेका धरला आणि आमदार रोहित पवारांनीही त्यात सहभाग घेतला.
रोहित पवार यांनी ट्वीट केला व्हिडिओ
रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यात म्हटलं आहे की, गायकरवाडी येथील कोविड सेंटरमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या झिंगाट गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times