सध्या सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गावात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्यक सेवाधारकांनाच पेट्रोल दिले जात आहे. अशा परिस्थितीत संचारबंदीच्या नियमांचे सर्वसामान्य नागरिकांना बंधन घालण्यात आले आहे. मात्र अशा काळातही काही नागरिक जाणीवपूर्वक करोना नियमांना पायदळी तुडवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
कडक लॉकडाउन असतानाही अनेक वर व वधुपिता करोनाच्या नियमांना हरताळ फासत गुपचूप लग्नसोहळे पार पाडत आहेत. या लग्न सोहळ्यांना प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या वतीने कारवाईची धडक मोहीम राबवण्यात येत आहे.
वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर येथे अशीच कारवाईची घटना घडली आहे. सोमवार , दि.२४ मे रोजी रामपूरच्या मल्लिकार्जुन महादेव सोनटक्के यांच्या मुलाचे लग्न होते. लग्नाचा मुहूर्त टाळून पोलिसांची नजर चुकवण्यासाठी शेतात लग्न सोहळा ठेवण्यात आला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. दुपारी २ वाजता हा सोहळा सुरू असतानाच पोलिसांनी लग्न सोहळ्यात थेट भेट दिली.
त्यावेळी २५ पेक्षा अधिक माणसे या सोहळ्याला जमलेली होती. त्यामुळे ५० हजार रुपयांचा दंड करून तो जागेवर वसुल करण्यात आला असल्याचे वळसंग पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी अतुल भोसले यांनी सांगितले.
ही कारवाई उपनिरीक्षक स्वामीराव पाटील, सहाफौ. शरनप्पा मेंगाने, संजय जमादार, हवालदार सूर्यकांत बिराजदार, मंथन सुळे, लक्ष्मण काळजे यांनी केली आहे. ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे लग्न घरातील वधुपित्यासह वरबापांचीही आता चांगलीच धाकधूक वाढली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times