: महाराष्ट्रात करोना रुग्णांची (Corona Patients) संख्या कमी होत असली तरीही ग्रामीण भागात अजूनही चिंता कायम आहे. कारण शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अपेक्षित प्रमाणात रुग्णवाढ थांबलेली नाही. त्यातच करोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस या आजारानेही हातपाय पसरले आहेत. अमरावती जिल्हाही याला अपवाद नाही. अमरावतीत दिवसेंदिवस म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या निदानासाठी चाचण्यांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. दर निश्चित करणारा अमरावती राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

अमरावतीत दर 3 हॉस्पिटलच्या मागे एक ऑडिटर देखील नेमण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेतला आहे. शासनाने दिलेल्या दरापेक्षा जास्त दर हॉस्पिटल घेत असेल तर नेमलेल्या ऑडिटर किंवा टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलं आहे.

जिल्ह्यात काय आहे म्युकरमायकोसिसची स्थिती?
करोना आजारातून बरे झालेल्या मधुमेही व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस आजार होताना आढळून येत आहे. जिल्ह्यात मुक्यरमायकोसिसचे अनेक रुग्ण आढळून आले आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी अधिक खर्च लागतो. जिल्ह्यात करोना व म्युकरमायकोसिस आजारांचा आकस्मिक आजारात समावेश करण्यात आला असून गरीब रुग्णांना या आजारांवर उपचाराचा खर्च महात्मा जोतिराव फुले जीवनदायी योजनेचा लाभ देऊन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्यामाध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात या इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीयस्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here