‌म. टा. प्रतिनिधी, मुंबईः करोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट झाल्याने आता निर्बंधात सूट देऊन लोकलप्रवास सुरू करण्याची मागणी जोर धरत आहेत. राज्य सरकारने सूचना केल्यानंतर तातडीने सर्वसामान्यांना लोकलमुभा देण्यात येईल. पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी सज्ज असून, केवळ राज्य सरकारच्या होकाराची प्रतीक्षा करत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

शहरात कडक निर्बंध सुरू असले, तरी छुप्या मार्गाने, मागच्या दाराने बाजारपेठांतील दुकाने सुरू आहेत. अनेक ठिकाणी दुकानाचे शटर बंद करून दुकानातील एक कर्मचारी बाहेर उभा असतो. ग्राहकांना काय हवे? काय नको? हे विचारून मागच्या दाराने दुकानात प्रवेश देतो. रिक्षा-टॅक्सींमध्ये मर्यादित प्रवासी निर्बंधाचे पालन क्वचितच होते. रेल्वे प्रवासासाठी हजारो बनावट ओळखपत्रांचा खुलेआम वापर होत असल्याचे रेल्वे अधिकारी देखील कबुली देतात. अत्यावश्यक प्रवाशांपैकी खरे कोण? आणि खोटे कोण? ओळखताना रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

पश्चिम रेल्वेवर सध्या ९५ टक्के लोकल फेऱ्या सुरू आहेत. रेल्वे मोटारमन, गार्ड, तिकीट तपासणीस, क्लार्क अशी सर्व यंत्रणा राबतच आहे. राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत सूचना दिल्यानंतर लोकलबंदी मागे घेतली जाईल. आम्ही पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या चालवण्यास सज्ज आहोत, असे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार करोना वाढीचा दरशून्य टक्के (०.२० टक्के) इतका झाला आहे. सर्वसामान्यांना लोकलमुभा देण्यासाठी अद्याप राज्य सरकारकडून अधिकृतपणे कोणताही पत्र व्यवहार झालेला नाही. सध्या मध्य रेल्वेवर ८० टक्के लोकल फेऱ्या धावत असून, राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर सर्वसामान्यांसाठी १०० टक्के लोकल फेऱ्या सुरू करण्यात येतील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here