सोलापूर : भाजपचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावरील तक्रारीचा अंतिम निर्णय येत्या तीन ते चार दिवसात जाहीर होणार आहे. सोलापुरात जात पडताळणी समितीकडून या तक्रारीची दखल घेत सुनावणी पार पडली. सोलापूर या आरक्षित लोकसभा मतदारसंघासाठी जयसिद्धेश्वर स्वामी यांनी बेडा जंगम या जातीचा दाखला सादर करत निवडणूक लढवली होती. पण हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता.

प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी जयसिद्धेश्वर स्वामींविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी नियुक्त दक्षता समितीने तपास करुन आपला अहवाल सादर केला. खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पुराव्यांसाठी दाखल केलेला दाखलाही संशयास्पद असल्याचं समितीने म्हटलं आहे. त्यामुळे जयसिद्धेश्वर स्वामींची धाकधूक वाढली आहे.

दक्षता समितीवर पक्षपातीपणाचा आरोप

दरम्यान, दक्षता समिती तक्रारदाराच्या दबावात काम करत असून त्रयस्थ समितीमार्फत तपास व्हावा, अशी मागणी जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या वकिलाने केली होती. पण जिल्हा जात पडताळणी समितीने हा अर्ज फेटाळून लावत सुनावणी पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. दक्षता समितीचा अहवाल मान्य नसून याविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचंही जयसिद्धेश्वर स्वामी यांचे वकील संतोष नाव्हकर यांनी सांगितलं आहे.

जात पडताळणी अवैध ठरल्यास पुढे काय
?

सोलापूर हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. त्यामुळे या मतदारसंघातून इतर जातीच्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर स्वामी यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवल्यास त्यांची खासदारकीही जाऊ शकते. पण याविरोधात हायकोर्टात दाद मागण्याचाही अधिकार त्यांच्याकडे असेल. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. या निवडणुकीसाठी जयसिद्धेश्वर स्वामींनी बेडा जंगम जातीचं प्रमाणपत्र दिलं होतं. पण त्यांचं मूळ प्रमाणपत्र हिंदू लिंगायत असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.

अशी झाली सोलापूरची लढत

२०१४ मध्ये निवडून आलेल्या शरद बनसोडेंना तिकीट न देता यावेळी भाजपने लिंगायत समाजातील आध्यात्मिक गुरू जयसिद्धेश्वर स्वामींना तिकीट दिलं. तर काँग्रेसनेही ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना तिकीट दिलं. शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद आणि केंद्रीय गृहमंत्रिपदही भूषवले आहे. सोलापूर एकेकाळी शिंदेंचा गड मानला जायचा. तर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यावेळी अकोल्यासोबत सोलापूरहूनही निवडणुकीस उभे राहिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीने सोलापुरात चांगलाच जोर लावला होता. मोठ्या प्रमाणात प्रचारही वंचितच्या नेत्यांनी या मतदारसंघात केला होता. पण विजय भाजपनेच मिळवला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here