आमदार गायकवाड हे मुंबईला गेले होते, रात्री दीड वाजता ते घरी परत आले. त्यानंतर तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी टू व्हीलरवर येऊन वाहनाची पेट्रोलची टॅंक जिथे असते, त्या ठिकाणी पेट्रोल टाकून इनोव्हा गाडी पेटवून दिली. या कारच्या मागे पुढे चार ते पाच गाड्या उभ्या होत्या. ती वाहने पेटली असती तर मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता होती. गायकवाड कुटुंबाला इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला गेल्याचा आरोप होत आहे. हा हल्ला करताना हल्लेखोरांनी या परिसरातील विद्युतपुरवठा तोडला होता. त्यामुळं हा पूर्वनियोजित कट असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
वाचा:
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळी घटनास्थळी पोहोचलं आहे. त्यांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तर श्वान पथकही घटनास्थळी पोहोचले होते.
वाचा:
संजय गायकवाड यांचं हल्लेखोरांना आव्हान
‘रोखठोक काम करण्याचा, खरं बोलण्याचा माझा जो स्वभाव आहे, तो एखाद्याला पटला नसेल किंवा आज माझ्या मतदारसंघात जी धडाक्यानं कामं सुरू आहेत, ती गेल्या ५० वर्षांत झाली नाहीत, ती एखाद्याला पाहवली नसतील म्हणून हा प्रकार केला गेला असावा. मात्र, हल्लेखोरांनी माझ्याशी सामना करावा. खुलेआम कुठेही बोलवावे. कुटुंबाशी खेळू नये. कुटुंबावर भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न करू नये,’ असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे. ‘पोलीस आपलं काम करत असून लवकरच ते हल्लेखोरांना पकडतील,’ असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times