अहमदनगर: दुचाकीला धक्का लागल्यानं एका दूध विक्रेत्याच्या कॅनमधील दूध सांडल्याचे निमित्त होऊन पाथर्डीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूंचे आठ जण जखमी झाले आहेत. शिरसाठवाडी आणि भिकनवाडा या भागात राहणारे जुनी भांडणे असलेले हे दोन गट समोरासमोर भिडले. दूध सांडल्याच्या कारणातून सुरू झालेली ही मारामारी एकमेकांचे रक्त सांडेपर्यंत झाली. यामध्ये संबंधितांच्या तसेच अन्य नागरिकांच्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. (Eight Injured in Clash Between Two Groups in , )

पाथर्डीतील अजंठा चौकात मंगळवारी रात्री ही घटना घडली. दोन्ही बाजूंच्या लोकांनी फिर्यादी दिल्या असून रात्री उशिरा पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या लॉकडाउन असल्याने दुकाने बंद आहेत. मात्र, स्टॉल लावून दूध विक्री सुरू आहे. शहरालगतचे दूध विक्रेते शहरात येऊन चौकात दुचाकी वाहने उभी करून दूध विकतात. मंगळवारी रात्रीही अशीच विक्री सुरू होती. तेव्हा शिरसाठवाडी येथील एका दूध विक्रेत्याला भिकनवाडा येथील एका दुचाकीचा धक्का लागला. त्यावरून वाद वाढत गेला. या दोन भागातील नागरिकांची यापूर्वीही अनेकदा भांडणे झाली आहेत. त्यामुळे काही वेळातच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि हाणामारी तसेच दगडफेक झाली. यामध्ये वाहनांचेही मोठे नुकसान झाले. पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. दोन परस्पर विरोधी फिर्यादी दाखल असून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाचा:

शिरसाठवाडी येथील गणेश बाळासाहेब शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यांच्या सोबत असलेले महादेव बाळासाहेब शिरसाट, नितीन नवनाथ शिरसाट, नवनाथ यशवंत शिरसाठ (रा. शिरसाठवाडी) हे अजंठा चौकात दुधाची विक्री करत होते. त्यावेळी भिकनवाडा येथील मुन्ना निजाम पठाण याच्या गाडीचा धक्का लागून दूध सांडले. याचा जाब विचारल्याने फारुख रफीक शेख, लाला रफीक शेख, निजाम रफीक शेख, जुबेर फारूख शेख, छोट्या राजू पठाण, जुबेर शफीक आतार, मुन्ना शेख (मटणवाला), भैय्या शेख, काल्या निजाम शेख, रंगनाथ गायकवाड, सोहेल पठाण, बब्बू रिक्षावाला, सुरज दहीवाले, असिफ शेख व इतर दहा ते बारा जणांनी आपल्याला तलवार, चाकू, लोखंडी गज, लाठ्या यांच्या सहायाने मारहाण केली. रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान केले.

वाचा:

दुसरी फिर्याद भिकनवाडा येथील अमीर उर्फ मुन्ना निजाम शेख यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून आरोपींनी डोक्यात लोखंडी गजाने मारहाण केली. आपण तसेच सहकारी तौफिक शेख, रंगनाथ गायकवाड, जुबेर शेख यांना तलवार, लोखंडी गज, लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावरून गोकुळ शिरसाठ, देवा शिरसाठ, प्रवीण शिरसाठ, गणेश शिरसाठ, नितीन शिरसाठ, संजय शिरसाठ यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे चौकात मोठी धावपळ उडाली. चौकात उभ्या असलेल्या अन्य नागरिकांच्या वाहनांचेही नुकसान झाले. पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here