मुंबई : राज्यात करोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे भीषण परिस्थिती ओढावली आहे. या महामारीला रोखण्यासाठी राज्यभर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक सणांवर याचा परिणाम झाला आहे. करोनाच्या या संकटाचा परिणाम यंदाच्या आषाढी वारीवरही होणार असल्याची चिन्ह आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यासंबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येत्या शुक्रवारी महत्त्वाची बैठक घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मागच्या वर्षीच्या आषाढी वारीवरही करोनाचं सावट होतं. त्यामुळे वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आताही फेब्रुवारी महिन्यापासून अचानक करोना रुग्णांची संख्या वाढल्याने यंदाची वारीही रद्द होणार का? असा प्रश्न समोर येत आहे.

पंढरपूरच्या वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून माऊली दर्शनासाठी येत असतात. पायी चालत पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठी गर्दी असते. पण करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठा हाहाकार माजला आहे. अद्यापही अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झालेली नाही. त्यामुळे यंदा वारीसंबंधी काय निर्णय घेण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, मुंबईत फेब्रुवारी मध्यापासून अचानक वाढलेली रुग्णसंख्या आणि त्यास रोखण्यासाठी लावण्यात आलेले लॉकडाउनच्या निर्बंधांची मात्रा लागू पडली आहे. राज्यात सुरू झालेल्या निर्बंधांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे करोनामुक्तांच्या संख्यावाढीसह प्रतिबंधित क्षेत्रेही घटली आहेत. मुंबईचा विचार करता, काही महिन्यांपूर्वी धडकी भरविलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या गेल्या महिनाभरात झपाट्याने घटली आहे. केवळ एकाच महिन्यात प्रतिबंधित क्षेत्रे सात हजारांपेक्षाही अधिक कमी झाली आहेत. त्यामुळे १५ लाखांहून अधिक मुंबईकर प्रतिबंधित क्षेत्राच्या कचाट्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here