पुणे : उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर (जि. पुणे) तालुक्याला देण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर करूनही अद्याप हा वाद मिटलेला नाही. बुधवारी (दि. २६) सोलापूरहून येत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानासमोर आंदोलनाचा प्रयत्न झाला. त्यावेळी पोलिसांनी दोन आंदोलकाना ताब्यात घेतलं.

दरम्यान, या घटनेनंतर बारामती इथलं शरद पवारांचं निवास्थान असलेल्या गोविंद बागेसमोरील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ आदी तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले होते.

सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि नेते मंडळींच्या रेट्यामुळे अखेर हा निर्णय मागे घेत असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केले होते. परंतु तसा कोणताही शासकिय आदेश अद्याप निघालेला नाही. त्यामुळे दुसरीकडे पाणी देण्याचा निर्णय रद्द झाल्याने इंदापूरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी हक्काच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्यात आंदोलनं सुरू केली आहेत.

बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकरी खासदार शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे इथील बंदोबस्त आधीच वाढविण्यात आला होता.

यावेळी पोलिसांनी दोन शेतकर्‍यांना तिथं दाखल होण्यापूर्वीच ताब्यात घेतलं. बारामती – निरा रस्त्यावर वाहनचालकांची तपासणी सुरू केली आहे. वाहनं तपासूनच पुढे सोडली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर गोविंदबागेसमोरील बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here