काळ्या बुरशीमुळे हा वेदनादायी आणि जीवघेणा आजार होतो. जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे २६५ रुग्ण आढळून आले. अर्थात, हा आजार नवा नाहीच. कोव्हिड काळापूर्वीही दरवर्षी या आजाराचे फारतर चार-पाच रुग्ण आढळायचे. परंतु, आता त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हा आजार संसर्गजन्य नाही. परंतु, प्रचंड खर्चिक आणि कुटुंब उद्ध्वस्त करणारा आहे. म्युकरमायकोसिस नेमका कशामुळे होतो, त्याची लक्षणे, उपचार काय आणि तो होऊच नये, यासाठी काय करावे याबाबतची इत्यंभूत माहिती.
* काय आहे म्युकरमायकोसिस?
म्युकरमायकोसिस म्हणजे काय?
– म्युकर हे एका बुरशीचे नाव आहे. म्युकर मायसिटीस नावाचा बुरशीचा समूह आहे. ही बुरशी जमिनीवर अधिक तसेच हवेत कमी प्रमाणात सापडते. या बुरशीने मानवाच्या शरीरात प्रवेश केला तर त्यामुळे होणारा आजार म्हणजे म्युकरमायकोसिस होय. ही काळी बुरशी प्रामुख्याने माती, प्राण्यांची विष्ठा, सडलेली फळे व सडलेल्या भाजीपाल्यात आढळते. नाकावाटे श्वसनमार्गाने ती शरीरात प्रवेश करते.
म्युकर मायकोसिस हा जुनाच आजार आहे का?
– कोव्हिड-१९ पूर्वीपासून हा आजार आहे. या आजाराला हिंदीत काला फफूंद तर इंग्रजीत ” म्हणतात. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि केंद्रीय आरोग्य विभागाने या रोगाबाबतच्या तपासण्या, निदान व उपचार याबाबत ९ मे रोजी मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या. हा आजार प्राण्यांकडून मानवाकडे संक्रमित होत नाही. परंतु, रोग प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत असलेल्या व्यक्तीवर ही काळी बुरशी हल्ला चढवते.
या बुरशीचा प्रवास कसा असतो?
– रोग प्रतिकारशक्ती कमी आणि अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या शरीरात ही बुरशी सहज प्रवेश करू शकते. रक्त आणि हाडांच्या पोकळीतून ही बुरशी पुढे सरकत जाते. नाकातून घशात, त्यानंतर दातांपर्यंत, डोळ्यांत आणि शेवटी मेंदूपर्यंत या बुरशीचा मार्ग असतो. पुढे जाताना ही बुरशी मागील रक्तवाहिन्यांचा पुरवठा बंद करते. त्यामुळे संबंधित रुग्णात आरोग्याच्या तक्रारी वाढत जातात.
* आजाराचे स्वरुप किती गंभीर?
करोनाबाधितांना धोका अधिक का?
– काही आजारांमध्ये अधिक तीव्रतेची औषधे दिल्याने त्याचा परिणाम रुग्णाच्या रोग प्रतिकारशक्तीवर होतो. रुग्णालयात त्यातही आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी स्टिरॉईड मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. अधिक काळ ही औषधे घ्यावी लागत असल्याने रुग्णाची रक्तातील साखर खूप वाढते. प्रतिकारशक्ती कमी होते. ही स्थिती अनुकूल असल्याने बुरशी रुग्णाच्या ऑक्सिजन पाईपमधून, पाण्यातून शरीरात प्रवेश करू शकते.
याचा धोका सर्वाधिक कोणाला आहे?
– अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्ती, रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींवर ही बुरशी हल्ला करते. करोनामुळे प्रतिकारशक्ती खालावत असल्याने अशा बाधित रुग्णांना या आजाराचा धोका वाढला आहे. यातही महिलांपेक्षा पुरुषांना हा आजार अधिक होतो.
म्युकरमायकोसिस शरीरात कोठे पसरतो?
– सुरुवातीला नाकातील सायनेसेसजवळ हा आजार होतो. नाकापासून मेंदूपर्यंत जाणारा हा आजार आहे. याशिवाय, हा आजार फुप्फुसाला होऊ शकतो. पोट आणि आतड्यांनाही होऊ शकतो. त्वचेला इतकेच नाही तर शरीरात अन्य कोठेही पसरू शकतो.
हा आजार गंभीर रूप केव्हा धारण करतो?
– या अत्यंत दुर्मिळ आजार आहे. कॅन्सरचे तीन टप्पे असतात व एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यावर जायला किमान एक महिना लागतो. परंतु, म्युकरमायकोसिसचे चार टप्पे आहेत. अवघ्या पाच दिवसांत रुग्ण एकेक टप्पा ओलांडत पुढच्या टप्प्यात म्हणजेच अति जोखमीत पोहोचतो. त्यामुळे अवघ्या १५ दिवसांत हा आजार शेवटच्या टप्प्यात पोहोचतो. पहिले ७२ तास म्हणजे तीन दिवसांत हा आजार औषधांवर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. बुरशी शरीरात पसरत जाऊ नये, यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. दुसऱ्या टप्प्यापर्यंत कान, नाक, घसा तज्ज्ञ रुग्णावर शस्त्रक्रिया करू शकतात. डोळ्यात बुरशी पोहोचली तर नेत्रविकार तज्ज्ञ पुढील उपचार करतात.
* लक्षणे नेमकी कोणती?
या आजाराची प्राथमिक लक्षणे कोणती?
– नाकातील खपलीने या आजाराची सुरुवात होते. खपली होताच तज्ज्ञांकडून वेळेत तपासून घेतले तर आजाराला तेथेच अटकाव करता येतो. कोविडमुळे शरीराच्या ज्या पेशी मरतात, त्यातून लोह तत्त्व (आयर्न) बाहेर पडते. हे या आजारातील बुरशीचे प्रमुख खाद्य असते. डोळे, नाकाभोवती तसेच चेहऱ्यावर सूज, नाकातून रक्त येणे, गाल व टाळूला बधीरता येणे, दात ढिले पडणे, डोके दुखणे ही काही प्रमुख लक्षणे आहेत.
म्युकरमुळे मृत्यू ओढवू शकतो का?
– वेळीच निदान होऊन उपचार सुरू केले नाहीत तर हा आजार रुग्णाला मृत्यूपर्यंत घेऊन जातो. नाक, घसा, डोळे आणि शेवटी मेंदू असा म्युकरमायकोसिसचा प्रवास होतो. हे सर्व भाग अत्यंत नाजूक आहेत. त्यामुळे गरज पडल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. या शस्त्रक्रिया खर्चिक व गुंतांगुतीच्या असतात. शस्त्रक्रिया किमान दोन तास चालते. बुरशी ज्या अवयवापर्यंत पोहोचते तो भाग काढून टाकण्याशिवाय पर्याय नसतो. अनेकांनी या आजारामुळे डोळे देखील गमावले आहेत. किमान दोन ते तीन आठवडे हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागतात.
या आजाराचे चार टप्पे कोणते?
– पहिला टप्पा : बुरशी नाकात असते. सर्दी, नाक बंद होणे, नाकातून रक्त पडणे, चेहऱ्यावर सूज येते.
– दुसरा टप्पा : बुरशी नाकातून सायनसमध्ये पोहोचते. डोळ्यांची एक नस सायनसमधून मेंदूपर्यंत गेलेली असते. ही नस देखील या बुरशीमुळे ब्लॉक होते. डोळे दुखणे, डोळे सुजणे व अंधुक दिसू लागणे ही प्रमुख लक्षणे आहेत.
– तिसरा टप्पा : बुरशी डोळ्यांत पोहोचते. तसेच फुप्फुसांतही जाऊ शकते. यात डोळ्यांची हालचाल बंद होणे, डोळे बंद होणे, अंधुक दिसणे, दिसणे पूर्णत: बंद होणे, फुप्फुसात झाला असल्यास खोकला वाढणे असा त्रास जाणवतो.
– चौथा टप्पा : ही बुरशी मेंदूमध्ये पोहोचते. यात रुग्ण बेशुद्ध होऊ लागतो. त्याचा मृत्यू ओढवतो.
* बचावासाठी काळजी काय घ्यावी?
म्युकरमायकोसिस होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?
– मधुमेह नियंत्रणात असेल तर हा आजार होण्याची शक्यता केवळ एक टक्का असते. तोंड, नाक, दात स्वच्छ ठेवावेत. रुग्णाला ऑक्सिजन देताना डिस्टिल्ड पाणी वापरावे. ते बदलत रहावे. स्टिरॉआईडचा वापर योग्य प्रमाणातच करावा. दहा एमएल बिटाडीन (पाच टक्के स्ट्रेन्थवाले) आणि १५ एमएल डिस्टिल वाटर एकत्र करावे. यामुळे बिटाडीन दोन टक्के होईल. त्याचे प्रत्येकी तीन थेंब प्रत्येक नाकपुडीत दिवसातून तीन वेळा सोडावेत.
हा आजार होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी?
– सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी. ती वाढणार नाही याची काळजी घ्यावी. रुग्णावर स्टिरॉईडचा अधिक वापर झाल्यास प्रतिकारशक्ती वेगाने कमी होते. त्यामुळे स्टिरॉआईडचा वापर योग्य प्रमाणातच व्हावा. तोंड, नाक, दातांसह शरीराची नियमित स्वच्छता ठेवावी. कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा करताना कटाक्षाने डिस्टिल्ड वॉटरचाच वापर करावा. नियमित योगा, व्यायाम, चौरस आहाराने रोग प्रतिकार शक्ती वाढवावी. पुरेशी विश्रांती घ्यावी.
म्युकरवरील उपचार खर्चिक असतात का ?
– उपचार प्रचंड खर्चिक असतात. या रुग्णांना शिरेतून एम्फोटेरिसीन बी औषध द्यावे लागते. हे औषध बुरशीला मारण्याचे काम करते. जी बुरशी उरते, तिच्यावर नियंत्रण ठेवणारी औषधे द्यावी लागतात. ही औषधे महागडी आहेत. या औषधांमुळे किडनीवर ताण येतो. त्यामुळे किडनीचेही दररोज मूल्यमापन करावे लागते. त्यानुसार औषधांचा डोस ठरवला जातो. रुग्णाच्या स्थितीनुसार एम्फोटेरिसीन बी ची किमान साठ ते शंभर इंजेक्शन द्यावी लागतात. हाच खर्च सात लाख रुपयांपर्यंत जातो. विविध डॉक्टर्स व उपचार खर्च वेगळा. डोळा व मेंदूला संसर्ग झाला तर खर्च आणखी वाढतो. या आजाराच्या उपचारासाठी कान, नाक, घसा, दंतरोगतज्ज्ञ, फिजीशियन अशी तज्ज्ञांची फौज लागते.
* उपचार शक्य आहे का?
या आजारावर पुरेशा उपचार सुविधा आहेत का?
– तूर्तास एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शन्सची मागणी प्रचंड वाढल्याने ते उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर्स, अद्ययावत उपचार सुविधांची कमतरता आहे. परंतु, सध्या तरी शहरात या सेवा-सुविधा चांगल्यापैकी उपलब्ध आहेत.
म्युकरमायकोसिस समूळ नष्ट होईल ?
– नाही. या आजाराचे रुग्ण आता वाढले असले तरी पूर्वीपासून हा आजार आहे. हा दुर्मिळ आजार असला तरी त्याचे पूर्ण उच्चाटन होणे अवघड आहे.
करोनासारखाच हा आजार संसर्गजन्य आहे का?
– हा आजार संसर्गजन्य नाही. परंतु, काळजी घेतली नाही तर रुग्णाच्या जीवितास धोकादायक आहे.
हा आजार केवळ मधुमेहींनाच होतो का?
– नाही. हा आजार कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे गाफिल राहू नये. कोव्हिडबाधितांनी त्याचा धोका अधिक असतो. कोव्हिड झाल्यानंतर साधारणत: तीन ते चार आठवड्याने रुग्णात हा आजार आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रुग्ण पूर्ण बरा होत नाही, त्याची रोग प्रतिकारशक्ती पुरेशी वाढत नाही तोपर्यंत त्याने विलगीकरणात राहाणे हितकारक आहे. केवळ मधुमेहींनाच नाही तर अन्य नागरिकांनाही हा आजार होऊ शकतो.
रुग्णालयांनी काय करावे?
– अतिदक्षता विभागात (आयसीयू) अनेक दिवस दाखल असणाऱ्यांत प्रामुख्याने हा आजार दिसतो आहे. रुग्णालय स्वच्छ ठेवणे अनिवार्य आहे. तेथील वातावरणात ही बुरशी राहात कामा नये. ऑक्सिजन ट्यूब स्वच्छ राहतील याची दक्षता घ्यावी. सिलिंडर ठेवलेल्या ठिकाणी बुरशी वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. ही बुरशी निर्माण होऊ नये, यासाठी ‘आयसीयू’ वेळोवेळी स्वच्छ करीत राहावा.
* लहान मुलांनी कितपत धोका?
करोनासारखे या आजारावर घरी उपचार घेता येतात का?
– नाही. या आजाराच्या रुग्णावर घरी उपचार करणे शक्य नसते. त्याची बायोप्सी करावी लागते. त्याद्वारे निदान शक्य होते. लवकर एम्फोटेरेसिन बी इंजेक्शन दिले तर शस्त्रक्रियेची वेळ येत नाही. आजार वाढत गेला तर शस्त्रक्रिया करून बुरशी काढावी लागते.
लहान मुलांसाठी हा आजार कितपत धोकादायक आहे ?
– वयाच्या ३५ वर्षांपुढील व्यक्तींना या आजाराचा धोका वाढत जातो. तुलनेने लहान मुलांना धोका कमी आहे. मात्र, मुलांची जीवनशैली नीट राहील याकडे लक्ष द्यावे. त्यांना चौकस व सकस आहार घ्यावा. रोग प्रतिकारशक्ती चांगली राहील याची काळजी घ्यावी.
कोव्हिडमुक्त रुग्णासाठी काय सूचना?
– करोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज करताना म्युकरमायकोसिस या आजाराच्या लक्षणांची एक चेक लिस्ट त्याने रुग्णालयाकडे मागावी. रुग्णालयाने ती स्वतःहूनच देणे अपेक्षित आहे. लक्षणे आढळल्यास तात्काळ कान, नाक, घसा या आजावरील डॉक्टराकडून उपचार करून घेण्याच्या सूचनाही प्रत्येक रुग्णालयाने रुग्णाला डिस्चार्ज देतेवेळी कराव्यात.
म्युकरबाधित रुग्णाचा आहार कसा असावा?
– ज्या आहारातून प्रोटीन्स मिळतील असा आहार घ्यावा. यामध्ये मांसाहार, मासे, अंडी याचा समावेश असल्यास उत्तम. याशिवाय दूध, डाळी यांचाही आहारात समावेश असावा.
* जिल्ह्यात कितपत तयारी?
म्युकरला रोखण्यासाठी जिल्ह्यात काय तयारी सुरू आहे?
– आतापर्यंत जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे सुमारे पावणे तीन हजार रुग्ण आढळल्याची अधिकृत माहिती आहे. ही रुग्ण संख्या त्याहून अधिक असू शकते. आवश्यक उपचार सेवा आणि सुविधांबाबतची दिशा ठरविण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे.
टास्क फोर्समध्ये कुणाचा समावेश आहे.
– म्युकरमायकोसिस टास्क फोर्समध्ये या विषयातील तज्ज्ञ डॉ. शब्बीर इंदोरवाला, डॉ. पुष्कर लेले, डॉ. प्रदीप गोंधळे, डॉ. शीतल गुप्ता, डॉ. भरत त्रिवेदी, डॉ. संजय बापये, महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महापालिकेचे नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड यांचा समावेश आहे. समन्वयक म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात काम पाहत आहेत. या व्यतिरिक्त विषयाच्या गरजेप्रमाणे अधिक तज्ज्ञांना विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्याची मुभा समन्वयकांना दिली आहे.
या आजारासाठी सरकारी उपचार सवलत लागू आहे का?
– राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश केला आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ रुग्णाला मिळू शकेल. जनआरोग्य योजनेत कान, नाक व घसा यावर उपचार करणाऱ्या ज्या रुग्णालयांचा समावेश नाही, त्यांचा तातडीने समावेश करण्यात यावा असे निर्देशही देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये यावर उपचार होणार का?
– होय. तशी तयारी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांनी सुरू केली आहे. या आजारासाठी आवश्यक असलेल्या मॉडेल ऑपरेशन थिएटर सिव्हिल हॉस्पिटल, मालेगाव रुग्णालय, आडगाव येथील एमव्हीपी कॉलेज, महापालिकेचे डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटल, बिटको रुग्णालय आणि इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी रुग्णालय या सहा ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे.
संकलन : प्रवीण बिडवे
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times