: कझाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान या भागात आढणारे ग्रिफॉन हे दुर्मिळ पहिल्यांदाच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावर घिरट्या घालताना दिसलं आहे. वनरक्षकांना या गिधाडाचे फोटो मिळाले असून त्याच्या पंखांवर नारंगी रंगाचा टॅग लावलेला आहे. टॅगमुळे हा पक्षी कोठून आला याची अधिक माहिती लवकरच पुढे येणार आहे.

व्याघ्र प्रकल्पातील जंगली जयगड भागात गस्त घालत असताना वनक्षेत्रपाल स्नेहल मगर आणि वनरक्षक संतोष चाळके यांना हा पक्षी आकाशात घिरट्या घालताना दिसला. नेहमीपेक्षा हा पक्षी वेगळा असल्याने त्यांनी गिधाडाचे फोटो टिपले. अधिक अभ्यासासाठी फोटो मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिले.

टिपलेला फोटो हा ग्रिफॉन गिधाडाचा असून त्यांच्या उजव्या पंखावर नारंगी टॅग दिसतो आहे. पक्ष्यांचा प्रवास मार्ग शोधण्यासाठी, त्यांच्या जीवनचक्र जाणून घेण्यासाठी प्रामुख्याने पक्ष्यांच्या पंखांना टॅग किंवा पायात रिंग घातली जाते. कोणत्याही पक्ष्यासाठी ही पद्धत वापरण्यापूर्वी केंद्रीय वन्यजीव संस्थेची परवानगी घेतली जाते. सह्याद्रीत दिसलेल्या ग्रिफॉन गिधाडाच्या पंखावर टॅग असल्याने लवकरच त्याची अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली.

या दुर्मिळ गिधाडाची नोंद केल्याबद्दल सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्रसंचालक समाधान चव्हाण यांनी वनक्षेत्रपाल स्नेहल मगर आणि संतोष चाळके यांचं अभिनंदन केलं आहे.

‘ग्रिफॉन गिधाड प्रामुख्याने तिबेट, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान ते नेपाळ, भूतान तसेच आफ्रिकेच्या काही भागात आढळते. हे गिधाड दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करते. त्याच्या डोक्यावर पंख पांढरे शुभ्र असतात तर पाठीवरचे पंख रुंद आणि तांबूस असतात. इतर गिधाडांप्रमाणेच हा पक्षी कुजलेले आणि सडलेले मांस खातो. उंच कड्यांवर घरटे बनवतो. वेगवेगळ्या देशात गिधाडांचा अभ्यास करणारे संशोधक आणि संस्थांना आम्ही या पक्ष्याच्या नोंदीची माहिती पाठवली आहे,’ अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here