पुणे लोहमार्ग अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत विविध मार्गावर रेल्वे गाड्यांमधून विनापरवाना मालाची आणि प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाल्याने लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मौला सय्यद यांना या प्रकरणाचा तपास करण्याची सूचना केली.
यानुसार, सय्यद यांनी रेल्वे गाड्यात पेट्रोलींग स्टाफ नेमला. सय्यद यांनी चार वेगवेगळ्या टीम तयार करून आठ ते दहा दिवसांपासून वेगवेगळ्या मार्गावरील रेल्वे गाड्यात पेट्रोलींग केलं. पुणे ते लोणावळा दरम्यान चेन्नई – एलटीटी एक्सप्रेस या गाडीत पेट्रोलींग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गाडीच्या ए-१ बोगीमध्ये सीट ९ आणि ११ वरून प्रवास करणाऱ्या व्यक्ती तरूणकुमार मोहन (वय २६, रा. वर्षे- चेन्नई) आणि श्रीनिवासन कमल (वय २०, रा. तामीळनाडू) यांच्याकडे एकूण चार ट्रॅव्हल बॅग आणि दोन संगवेग आढळून आल्या.
लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांना त्याबाबत संशय आल्याने त्यांनी बॅग तपासून पाहिली. तर, त्यात कासव, सरडे आणि फायटर फिश असल्याचं दिसून आलं. त्याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा परवाना आणि कागदपत्रे नव्हती. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना प्राण्यांसह ताब्यात घेतलं.
लोहमार्ग पोलीस अधीक्षक वायसे पाटील, अतिरिक्त अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मौला सय्यद, सहायक निरीक्षक अंतरकर, सहायक फौजदार सुनिल भोकरे, जगदेश सावंत, हवालदार सुनिल कदम, सुहास माळवदकर आदींनी ही कारवाई केली.
सर्व प्राणी परदेशी प्रजातींचे
वनअधिकारी आणि स्टाफ यांच्या मदतीने या प्राण्यांची नेमकी प्रजाती समजण्यासाठी आणि संख्या मोजण्यासाठी चांदणी चौक येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट इथं नेण्यात आलं आहे. तस्कारी केलेल्या प्राण्यांत आफ्रिकन प्रजातीचे २७९ कासव, इग्णूआ जातीचे १२०७ सरडे आणि २३० बेटा फिश असल्याचे स्पष्ट झाले.
हे प्राणी परदेशी प्रजातीचे असल्याने आणि त्या व्यक्तींनी सिमाशुल्क विभागाची परवानगी न घेता वाहतूक केल्याने दोन्ही व्यक्तींना कारवाईसाठी सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times