मुंबई : दुसऱ्या लाटेत करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाला असून गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचं चित्र आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ट्रेंड आज बदलला असून बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा बाधित रुग्णांची संख्या जास्त आढळली (Number of Corona infected patients is higher than the number of patients who have recovered in the state today) आहे. मागील २४ तासांत राज्यात नवीन २४ हजार ७५२ रुग्ण आढळले आहेत, तर २३ हजार ०६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज ४५३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मात्र आज नोंद झालेल्या एकूण ४५३ मृत्यूंपैकी ३२३ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत, तर १३० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६२ टक्के एवढा आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर किती?
दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या अचानक प्रचंड प्रमाणात वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला. परिणामी राज्यातील काही भागांमध्ये आरोग्य सुविधांअभावी करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र नंतर परिस्थिती सुधारू लागली आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं. राज्यात आजपर्यंत एकूण ५२,४१,८३३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७६ टक्के एवढे झाले आहे.

दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३८,२४,९५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,५०,९०७ (१६.७१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,७०,३२६ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत तर १९,९४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्रातील कोणत्या भागात करोना संसर्गाची काय आहे स्थिती?
राजधानी मुंबईत मागील २४ तासात १३५२ बाधित रुग्ण आढळले आहेत, तर १०२१ रुग्ण बरे झाले आहेत. शहरात आता २७ हजार ९४३ सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात आज १६०७ नवे रुग्ण आढळले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा मागील २४ तासांत ३१८ एवढा नोंदवला गेला. त्यात महापालिका ९९ तर ग्रामीण भागात २१९ रुग्णांची भर पडली. उपचारादरम्यान १७ जणांचा बळी गेला. कोल्हापूरमध्ये १६९९, सोलापूरमध्ये ९०३, जळगावमध्ये २२४, लातूरमध्ये २०८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here