म.टा. प्रतिनिधी,

रेड झोनमध्ये समावेश असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत असली तरी मृत्यूंचे प्रमाण मात्र कायम आहे. ही चिंता वाढविणारी गोष्ट असतानाच नव्या रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करून प्रशासनाने काम सुरू केल्याचे सांगण्यात येत असले तरी बाधित मुलांची माहिती मात्र अद्याप वेगळी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
गेल्यावर्षी १२ मार्चला नगर जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. यार्षी बारा मार्चला एकूण बाधितांची संख्या ७९,५२८ होती. त्या दिवशी २,०१५ रुग्णांवर उपचार सुरू होते, तर वर्षभऱात १,१७० मृत्यू झाले होते. त्यानंतर दुसरी लाट आली. अवघ्या दोन-अडीच महिन्यांत आकड्यांमध्ये कमालीची वाढ झाली. २६ मे रोजी जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या २,५५,१७७ झाली आहे. २,३८,३७८ रुग्ण बरे होऊन परतले असून १३,८३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (the number of new covid patients decreased but the death toll was alarming in Ahmednagar district)

या काळात मृत्यूचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढले. २६ मे पर्यंत २,९६९ जणांनी करोनामुळे जीव गमावला आहे. अवघ्या दोन-अडीच महिन्यांत १,७९९ मृत्यू नोंदले गेले. एप्रिल महिन्यात मृत्यूचे तांडवच सुरू होते. अद्यापही मृत्यूचे आकडे कमी होताना दिसत नाहीत. गेल्या २४ तासांत ६६ मृत्यू झाल्याची नोंद आहे. नव्या बाधितांचे आकडे कमी होत आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होत आहे. त्यामुळे बेड, ऑक्सिजन, औषधे यासाठी दोन महिने सुरू असलेली धावपळ आता थांबली आहे. ही जमेची बाजू असली तरी मृत्यूंचे आकडे चिंताजनक आहेत. करोनानंतर आलेल्या म्युकरमायकोसिसनेही चिंता वाढविली असून आतापर्यत १८० रुग्ण आढळून आले असून त्यातील चौघांचा मृत्यूही झाला आहे. याशिवाय काही गंभीर रुग्ण पुण्यातही दाखल आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्याचे सांगण्यात येत असल्याने बाधित मुलांच्या आकेडवारीकडेही लक्ष लागले आहे. मात्र, प्रशासनाकडून ही आकडेवारी अदयाप वेगळी उपलब्ध करून दिली जात नाही. गेल्या २४ तासांत बाधित आढळून आलेल्या रुग्णांच्या यादीतून माहिती घेतली असता जिल्ह्यात १ ते १४ वयोगटातील १६५ बालके तर १५ ते १७ वयोगटातील ८० बाधितांची नोंद झाल्याचे आढळून येते. १८ वर्षांखालील रुग्णांसाठी आद्याप लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे या वयोगटांतील रुग्णांवर विशेष लक्ष देण्यासाठी टास्क फोर्स सुरू करण्यात आलेले आहेत. त्यातून हॉस्पिटलमध्ये सज्जता ठेवण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. बाधित रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण स्थानिक आरोग्य विभागाला मान्य नसल्याचे दिसून येते. शिवाय आकडेवारीत अचानक तफावत आढळून आल्यास रुग्णालयांकडून एकदम माहिती भरली जात असल्याने असे प्रकार होत असल्याचे सांगून प्रशासन एकप्रकारे ढिसाळपणाला पाठीशी घालत असल्याचे दाखवून देते.

क्लिक करा आणि वाचा-
सध्याच्या निर्बंधांची मुदते ३१ मे रोजी संपणार आहे. त्यानंतर परिस्थिती पाहून जिल्हानिहाय निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात त्यावेळी काय परिस्थिती असेल, आणि काय निर्णय होईल, याकडे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत नगर जिल्ह्याची कामगिरी आणि आदर्श गाव हिवरेबाजार मधील प्रयोग याची मोठी चर्चा झाली होती. यावरून जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांनी एकमेकांचे कौतूकही केले होते.

क्लिक करा आणि वाचा-

असे असले तरी ग्रामीण भागातील अनेक तालुक्यांतील दैनंदिन रुग्ण संख्येचे आकडे अद्यापही दोनशेच्या खाली आलेले नाहीत. दोन अंकी संख्या असलेले मोजकेच तालुके आहेत. त्यातही हे आकडे सतत बदलताना दिसून येत आहेत. त्यामुळे प्रशासन दावा करीत असलेल्या उपाययोजनांचा या भागात अद्याप तरी फरक जाणवत नसल्याचे दिसून येते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here