राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत झालेली खडाजंगी, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरून केलेली टीका, मंत्री आवाज चढवून मंत्रिमंडळ बैठकीत बोलत असल्याबाबत नाराजी, अशा राज्य मंत्रिमंडळातील कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यामध्ये बुधवारी चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या पुढाकाराने राज्यात सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार टिकविणे ही केवळ शिवसेनेची जबाबदारी नसल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे पवार यांच्या ध्यानात आणून दिल्याचे समजते.
पित्ताशयाचे ऑपरेशन झाल्यानंतर पवार पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सुमारे ४० ते ४५ मिनिटे ही बैठक झाली. या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, हे जरी समजू शकले नसले तरी विविध मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते. ‘तौक्ते’ वादळातील नुकसानग्रस्तांना करायची मदत, करोना आणि म्युकरमायकोसिसचे संकट, लॉकडाउनमुळे अनेक घटकांवर आलेल्या संकटासह मराठा आरक्षणावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत झालेली खडाजंगी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरील आक्षेप याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. मात्र, या बैठकीतील अधिकृत तपशील रात्री उशिरापर्यंत मिळू शकला नाही.
मराठा आरक्षणावर ऊहापोह
गेल्या काही दिवसांत विविध घटकातील नेत्यांनी पवार यांची भेट घेतली होती. राज्यात कडक निर्बंधामुळे उद्भवलेल्या समस्यांचे निवेदन या घटकांनी पवार यांना दिले होते. पवार यांनी या घटकांच्या मागण्या तसेच मराठा आरक्षण रद्द झाल्याने संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या मागण्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. ‘तौक्ते’ वादळामुळे कोकणासह राज्यातील अनके भागांचे नुकसान झाले आहे. केंद्राकडून तोकडी मदत मिळाली असून ही कशी वाढवून घेता येईल तसेच राज्याकडून जाहीर करायच्या पॅकेजवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. गेल्या काही महिन्यात राज्यात करोनाचा संसर्ग कमी झाला आहे. पण म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे निर्बंधाबाबत नेमके काय करायचे, याबाबत मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्याकडून सल्ला घेतल्याचे समजते.
विकासकामांवर चर्चा
राज्याचे नगरविकासमंत्री यांनी पवार यांचे कौतुक केले. पवार यांचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे. करोनाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीतही ही भेट झाली. त्यामुळे त्यांना माझा सॅल्यूटच आहे, असे शिंदे म्हणाले. तसेच पवार-मुख्यमंत्र्याची भेट नेमकी कशाबाबत झाली, हे मला माहीत नाही. पण विकासकामांच्या मुद्द्यावर पवार नेहमी भेटतात. त्यानुषंगानेच ही भेट असावी, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times