नाशिकः ब्रह्मगिरी डोंगराच्या पायथ्याशी अवैधरित्या उत्खनन सुरु असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनानं याची गंभीर दखल घेत कठोर कारवाई केली आहे. डोंगराचे अवैध उतखनन प्रकरणी संबंधित तलाठी आणि कोतवाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ब्रह्मगिरी पर्यावरणीय दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा डोंगर असून, सह्याद्री पर्वतरांगेतील वन्यजीवांचा अधिवास येथे आहे. अनेक देशी प्रजातीची वृक्ष, लाल माती यासह गिधाडांचे वास्तव्य या क्षेत्रात आहे. या राखीव वन क्षेत्रात कोणत्याही प्रकारे वृक्षतोड, खोदकाम, चराईला परवानगी नाही. असे असूनही राखीव वनक्षेत्रात खोदकाम केले जात असल्याचे दिसते आहे. ब्रह्मगिरी डोंगरावर सुरू असलेले खोदकाम वन क्षेत्रात असल्याची माहिती समोर येताच ‘मटा’सह ग्रामस्थांनी हा मुद्दा प्रकाशझोतात आणला होता. त्यानंतर पश्चिम वन विभागातून कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले होते. पर्यावरण मंत्री यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासन यंत्रणेला कारवाईचे आदेश दिले होते.

अवैध उत्खननप्रकरणी संबंधित तलाठी आणि कोतवाल यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर, मंडलाधिकारी आणि तहसीलदार यांना प्रांतधिकारी तेजस चव्हाण यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसंच, या प्रकरणाचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी संबंधित विकासकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी आवश्यक ती कारवाई तात्काळ करण्यात येत असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

सेव्ह ब्रह्मगिरी मोहिम

परवानगी नाकारलेली असतानाही ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याचा प्रकार ‘महाराष्ट्र टाइम्स’ने उघडकीस आणत ‘सेव्ह ब्रह्मगिरी’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत अनेक पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. राज्य सरकारनेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, हे काम तातडीने थांबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. अवैधरीत्या गौण खनिजाचा उपसा केल्याने प्रशासनाने संबंधितांना एक कोटी ५२ लाख रुपये दंड भरण्याची नोटीसही बजावली आहे. ब्रह्मगिरी अवैध उत्खननाचे हे प्रकरण तडीस नेले जाईल, असं आश्वासन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here