मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेतीन वाजता राज्यमंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये लॉकडाऊन वाढणार की शिथिल होणार यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
खरंतर, एप्रिल- मे महिन्यात राज्यात करोना रुग्णांच्या संख्येनं उच्चांक गाठला होता. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने एप्रिलमहिन्यात लॉकडाऊन घोषित केला होता. त्यानंतर टप्याटप्यानं या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली होती. मे महिन्याच्या १५ तारखेपासून करोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात अटोक्यात येत आहे. त्यामुळं १ जूनपासून राज्यातील कठोर निर्बंध शिथील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
करोनाचा प्रादुर्भाव आता नियंत्रणात आला आहे. मुंबईतील स्थिती नियंत्रणात आहे. नाशिक, नागपूरमधील स्थितीदेखील दिलासादायक आहे. त्यामुळं या भागातील निर्बंध १ जूनपासून काहीप्रमाणात शिथील केले जातील. निर्बंध एकहाती मागे घेण्यात येणार नसून टप्याटप्यानं मागे घेतले जातील, असं सूचक विधान राजेश टोपे यांनी केलं होतं. त्यानुसार राज्य सरकारही महाराष्ट्र अनलॉक करण्यास अनुकुल असल्याचं बोललं जात आहे.
१ जूनपासून राज्य सरकार काही गोष्टींवरील निर्बंध मागे घेण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात व्यापाऱ्यांना दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. लॉकडाऊनमध्ये दुकानदारांना सकाळी ७ ते ११पर्यंत दुकानं उघडण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात हे निर्बंध मागे घेण्यात येऊन पूर्ण दिवस दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार व मद्यालय या सेवा सुरु करण्यात येतील. तर, चौथ्या टप्प्यात करोना परिस्थितीचा आढावा घेऊन सरकार मुंबई लोकल व धार्मिक स्थळांबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसंच, ज्या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहेत तिथं रुग्णसंख्या पाहून निर्णय घेण्यात येणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times