चालक आपल्याकडे अश्लील नजरेने पाहत असून त्याने मार्गही बदलल्याचे लक्षात येताच महिलेने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची धक्कादायक घटना परिसरात उघडकीस आली आहे. धावत्या रिक्षातून उडी मारल्याने ही महिला जखमी झाली असून, मुलुंड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच असा प्रकार घडल्याने मुलुंडमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मुलुंडमध्ये वास्तव्यास असलेल्या २२ वर्षीय महिलेने येथील पंचरत्न परिसरात जाण्यासाठी गुरुवारी रात्री रिक्षा पडकली. रिक्षामध्ये बसल्यापासून रिक्षाचालक आरशामधून एकटक आपल्याकडे पाहत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने सुरुवातीला दुर्लक्ष केले; मात्र चालकाची अश्लील नजर हलतच नव्हती. त्यातच काही अंतर पुढे गेल्यानंतर महिलेने सांगितलेल्या ठिकाणच्या मार्गाने न जाता चालकाने विरुद्ध दिशेला रिक्षा वळवली. त्यामुळं ती प्रचंड घाबरली. त्याला विचारण्याची हिंमत होईना, अखेर तिने संधी मिळताच धावत्या रिक्षातून उडी मारली. उडी मारली त्यावेळी नेमकी रिक्षा गतिरोधकावर असल्याने तिचे डोके त्यावर आदळले. याचदरम्यान येथून जाणाऱ्या पादचाऱ्यांनी तिला उचलले आणि रुग्णालयात दाखल केले. रिक्षाचालकाने मात्र तेथून पळ काढला. हा प्रकार समजल्यानंतर मुलुंड पोलिसांनी रुग्णालयात जाऊन तिचा जबाब नोंदवला. तिने दिलेल्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं रिक्षावाल्याचा शोध घेतला. रिक्षाच्या नंबर प्लेटवरून चालकाला अटक करण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times