मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण परिसरात मोठं नुकसान झालं. अनेकांची घरी उद्धवस्त झाली, तर फळबागांचंही मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. वसईतील एका वृद्धाश्रमालाही या चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यानंतर या वृद्धाश्रमात राहणाऱ्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या शाळेतील शिक्षिका सुमन रणदिवे (वय ८८) यांनी आपली व्यथा मांडत मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या या शिक्षिकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन केला आहे.

राज ठाकरे यांनी फोन करुन सुमन रणदिवे यांची विचारपूस केली. यावेळी सुमन यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसंच जास्तीत जास्त मदत कर, असं हक्काने आपला विद्यार्थी राहिलेल्या राज यांना सांगितलं. यावर राज यांनीही तातडीने मदत करण्याचं आश्वासन दिलं. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मी सर्व घटना सांगितली आहे, लवकरात लवकर मदत होईल, असा शब्द राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

‘लॉकडाऊन संपताच भेटायला येणार’
सुमन रणदिवे यांनी राज यांना सांगितलं की, तू मध्यंतरी इकडे आला होतास, पण आपली भेट होऊ शकली नाही. यानंतर राज यांनीही उत्तर देत, लॉकडाऊन संपल्यानंतर लगेच भेटायला येतो, असं म्हणत आपल्या वृद्ध शिक्षिकेला धीर दिला.

राज-उद्धव आणि बालमोहन विद्या मंदिर
राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे यांचंही प्राथमिक शिक्षण बालमोहन विद्या मंदिर या शाळेत झालं आहे. तेव्हा सुमन रणदिवे या बालमोहन विद्या मंदिरात गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षिका होत्या. १९९१ साली त्या शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्या. मागील वर्षभरापासून त्या वसई येथील न्यू लाईफ फाउंडेशन या वृद्धाश्रमात वास्तव्यास आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here