ग्रामस्वच्छता अभियान आणि तंटामुक्त गाव योजनेची जशी चळवळ झाली, तशीच करोनामुक्त गाव योजना सुरू केल्यास या कामाला पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या लाटेत सुरक्षित राहिलेल्या हिवरे बाजार गावात दुसऱ्या लाटेत पहिल्याच टप्प्यात करोनाने प्रवेश केला. मात्र पवार यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी एकत्र येत नियोजनबद्ध पध्दतीने काम सुरू केले. आरोग्य यंत्रणेसोबतच गावातील सर्व घटकांचे यासाठी योगदान घेण्यात आले. विविध पथके स्थापन करून कामाला सुरवात झाली. एकत्र आणि नियोजनाप्रमाणे काम करण्याचा अनुभव गावाचे नेतृत्व आणि गावकऱ्यांनाही असल्याने याचे दृष्य परिणाम दिसू लागले.
२० मार्च २०२१ ला गावात पहिला रुग्ण आढळून आला. सुरवातीला गंभीर्य वाटले नाही. मात्र, एप्रिलमध्ये संसर्ग वाढत असल्याचे पाहून वेगाने उपाय सुरू झाले आणि १५ मे रोजी गाव करोनामुक्त करण्यात यश आले. करोमुक्तीनंतर आता नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण हाती घेण्यात आले आहे.
मधल्या काळात हिवरेबाजारच्या या यशाची मोठी चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या गावाची यशोगाथा देशाला सांगितली. त्यानुसार आता नगर जिल्ह्यात काम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारनेही याची दखल घेतली. ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पवार यांच्याकडून याची माहिती घेतली. त्यानंतर आता पवार यांनी हिवरे बाजारमध्ये ही मोहीम कशी राबविली, अन्य गावांत कशी राबविता येईल, याची स्पर्धा कशी घेता येईल, याचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना तो पाठविण्यात आला आहे. यामध्ये गावात कशा पद्धीतीने काम केले, याची तपशीलवार माहिती दिली आहे. या आधारे राज्यातील २८ हजार गावांत काम व्हावे, याला चळवळीचे स्वरूप यावे, यासाठी करोनामुक्त गाव स्पर्धा आयोजित करावी. त्यासाठी गुण आणि निकष ठरवून बक्षीस योजनाही जाहीर करण्यात यावी, अशी सूचना पवार यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times