: करोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी जास्त त्रासदायक ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असल्यानं सरकारनेही त्यासंबंधी तयारी सुरू केली आहे. मात्र, दुसऱ्या लाटेतही (Corona Second Wave) लहान मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढल्याचं नगर जिल्ह्यात आढळून आलं आहे. एप्रिममध्ये साडेनऊ टक्के असलेलं हे प्रमाण मे महिन्यात ११ टक्क्यांवर गेलं आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नगर जिल्ह्यातील एप्रिल व मे महिन्याच्या तुलनात्मक आकडेवारीची माहिती दिली. त्यानुसार एप्रिल महिन्यात १८ वर्षांखालील ७ हजार ६०७ मुलांना करोनाचा संसर्ग झाला. एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण साडे नऊ टक्के होतं.

मे महिन्यात गेल्या २६ दिवसांत जिल्ह्यात एकूण ७७ हजार ९९२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील रुग्णांची संख्या ८ हजार ८८१ आहे. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ११ टक्के आहे. यामध्ये एक वर्षाच्या आतील रुग्णांची संख्या ८५ असून १ ते १० या वयोगटातील रुग्ण संख्या २ हजार ६९४ आहे. तर ११ ते १८ या वयोगटातील रुग्णांची संख्या ६ हजार १०२ आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात मुलांमधील संसर्ग वाढल्याचे दिसून येते.

रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण नगण्य
मुलांना संसर्ग वाढत असला तरी बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत. ठरलेल्या कालावधित उपचार घेऊन ती बरी होत आहेत. नगर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरमध्ये हे रुग्ण दाखल होत आहेत. या संपूर्ण काळात आतापर्यंत एक मृत्यू झाला आहे. त्यालाही अन्य गंभीर आजार आधीपासूनच असल्याचे सांगण्यात आले. तर गंभीर रुग्णांचं प्रमाणही नगण्य आहे. त्यामुळं संसर्ग होत असला तरी तो फारसा धोकादायक ठरत नसल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे.

राज्यस्तरावरून आलेल्या सूचनांनुसार उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत यासंबंधी काम सुरू करण्यात आले आहे. कुटुंबातील अन्य सदस्यांना बाधा झाल्यास त्यांच्या संपर्कात आलेली घरातील लहान मुलं बाधित झाल्याचे कुटुंब सर्वेक्षणाच्या वेळी आढळून येत आहे. तर काही प्रमाणात लक्षणे दिसल्यानंतर बालरोग तज्ज्ञांकडे उपचारासाठी आलेल्या मुलांना बाधा झाल्याचे आढळून येत आहे.

दोन महिन्यांपासून दररोज बालरोग तज्ज्ञांकडे येणाऱ्यांपैकी दहा ते बरा लहान मुले करोना बाधित आढळून येत आहेत. मात्र, त्यातील ८० टक्के मुलं लक्षणे नसलेली किंवा सौम्य लक्षणे असलेली आहेत. बरीच मुलं घरीच बरे होत आहेत. खूपच कमी मुलांना ऑक्सिजनची गरज भासली. अंत्यत कमी प्रमाणात आयसीयूची गरज पडली. याबाबत बालरोग तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांनी माहिती दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here