पुणे : शेतकऱ्यांना उसाची रास्त व किफायतशीर किंमत () न देणाऱ्या कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत. कारण दहा कारखान्यांना महसुली वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नोटिसा पाठवण्यात येणार आहेत. आतापर्यंत १९ कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या कारखान्यांकडून सुमारे ६५६ कोटी रुपये वसूल होतील, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

‘आगामी वर्षात ऊस लागवडीचे क्षेत्रफळ आणखी वाढणार आहे. सुमारे १२ लाख हेक्‍टर क्षेत्रफळावर ऊस लागवड होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. द्राक्ष, सोयाबीन आणि डाळिंब ही पिके अडचणीत आल्यामुळे संबंधित शेतकरी हे ऊस पिकाची लागवड करण्याची शक्यता आहे,’ अशी माहितीही गायकवाड यांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, एफआरपीत वाढ होण्याची शक्यता
‘या वर्षी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केली असल्याने साखरेचा गाळप उतारा १०.५० टक्के आहे. इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या उसाच्या रसाची किंमत काढून त्याचा समावेश करण्यात येणार असल्याने साखरेचा सरासरी गाळप उतारा वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एफआरपीमध्ये आणखी वाढ होईल,’ असा अंदाज शेखर गायकवाड यांनी वर्तवला आहे. तसंच राज्यात यंदाच्या गाळप हंगामात उसाचे १०१२ लाख टन गाळप होऊन १०६.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदाचा गाळप हंगाम संपला असून, सुमारे २०८ दिवस कारखान्यांमध्ये गाळप सुरू होते. यावर्षी सर्वधिक १९० कारखान्यांनी गाळप घेतले. साखरेचा सरासरी गाळप उतारा हा १०.५० टक्के झाला आहे, असंही गायकवाड यांनी सांगितलं.

कोणत्या साखर कारखान्यांना पाठवणार नोटीस?
कारवाईदरम्यान कोणत्या साखर कारखान्यांना महसुली वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नोटिसा येत्या सोमवारपर्यंत पाठवल्या जाणार आहेत, याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

अशी आहे यादी :
विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सोलापूर
सिद्धनाथ शुगर लिमिटेड, उत्तर-सोलापूर
लोकमंगल शुगर लिमिटेड, दक्षिण सोलापूर
गोकुळ माऊली शुगर, अक्कलकोट
संत दामाजी कारखाना, मंगळवेढा
भीमा सहकारी साखर कारखाना, मोहोळ, सोलापूर
मकाई सहकारी साखर कारखाना, करमाळा, सोलापूर
लोकमंगल माऊली शुगर, सोलापूर
कंचेश्वर शुगर लिमिटेड, उस्मानाबाद
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, बीड

ऑक्सिजन प्रकल्पाबाबत काय म्हणाले साखर आयुक्त?
‘माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आवाहन केल्यानंतर राज्यातील २५ साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीची तयारी दर्शवली असून, धाराशिव साखर कारखान्यांने ऑक्सिजन निर्मिती सुरू केली आहे. १९ कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी तैवान येथून यंत्रसामग्री मागविली आहे,’ अशी माहिती शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here