: काँग्रेसचे नेते (NCP ) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या मुक्ताईनगरात राजकीय भुकंपाची शक्यता आहे. नगरपंचायतीमधील खडसे समर्थक ६ नगरसेवकांनी काल बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या मनगटावर शिवबंधन बांधलं. शिवसेनेने जळगाव महापालिकेत सत्तांतर केल्यानंतर आता पाठोपाठ मुक्ताईनगर नगरपंचायतीवर झेंडा फडकविण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान ४ भाजप आणि १ अपक्ष अशा ५ नगरसेवकांनीच पक्षांतर केल्याची माहीती खडसे यांनी दिली आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. १७ पैकी १३ नगरसेवक भाजपचे, ३ शिवसेनेचे तर १ अपक्ष नगरसेवक आहे. अपक्ष नगरसेवकाने भाजपला पाठिंबा दिल्याने संख्याबळ १४ झाले आहे. येथील नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्यासह सत्ताधारी गटातील नगरसेवक हे खडसे गटाचे समर्थक आहेत. खडसेंनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, भाजपात असलेले नगरसेवक खडसेंच्या गटाचेच मानले जातात.

अपक्षासह भाजपाच्या नगरसेवकांनी बुधवारी मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून ६ तर राष्ट्रवादीकडून ५ नगरसेवकांच्या पक्षांतराचा दावा शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, आज गुरुवारी भाजपचे अजून काही नगरसेवक शिवसेनेत दाखल होतील, असा दावा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरातील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना भाजपाचे ४ आणि १ अपक्ष अशा ५ नगरसेवकांनी पक्षांतर केल्याचे सांगितले. भाजपाचे ९ नगरसेवक हे मुक्ताईनगरातच तसेच नगराध्यक्षा नजमा तडवी या देखील घरीच असल्याचे त्यांनी सांगितले.

अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर- खडसे
‘मुंबईत भाजपच्या ४ तर १ अपक्ष नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केल्याचे दिसत आहे. यातील ३ नगरसेवकांनी अतिक्रमण आणि खोटा दाखला सादर केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई प्रस्तावित आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत १ तारखेला सुनावणी होणार आहे. त्यांच्यातील अन्य एका महिला नगरसेविकेवर ४ अपत्य असल्याने यापूर्वीच अपात्रतेची कारवाई झाली आहे. शिवसेनेत प्रवेश करून अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी नगरसेवकांचा खटाटोप सुरू असल्याचा दावाही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

खडसेंनी प्रतिक्रिया का द्यावी? आमदार पाटील यांचा सवाल
पक्षांतर करणारे नगरसेवक हे भाजपचे आहेत. खडसे आता राष्ट्रवादीत आहेत. मग या विषयावर खडसे यांनी प्रतिक्रिया का द्यावी? असा सवाल आमदार चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे. तसंच भाजपचे आणखी ४ नगरसेवक संपर्कात असून पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here