करोना काळात साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन आपल्या भागात यासंबंधी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यानुसार अनेक कारखान्यांनी कोविड सेंटरसह अन्य उपक्रम सुरू केले आहेत. आता लसीकरणाचीही अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. संगमनेर कारखान्यात सर्व मिळून सुमारे बाराशे कामगार आहेत. त्यांच्यासाठी कारखान्याने संगमनेरमधील एका खासगी हॉस्पिटलच्या मदतीने लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. १ जूनपासून ही मोहीम सुरू होणार आहे. सरकारने आता खासगी हॉस्पिटलला लस उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार संगमनेरमधील या हॉस्पिटललाही कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्फुटनिक या लशी उपलब्ध होणार आहेत.
वाचा:
संगमनेर कारखान्याने एक परिपत्रक काढून कामगारांना याची माहिती दिली आहे. लसीसाठी लागणारे शुल्क कामागारांच्या पगारातून वसूल करून त्या हॉस्पिटलला देण्याची जबाबदारी कारखान्याने घेतली आहे. त्यासाठी जीएसएटी आणि सर्व शुल्क मिळून किंमत जाहीर करण्यात आली आहे. कोविशिल्ड एक हजार रुपये, कोव्हॅक्सिन बाराशे रुपये तर स्फुटनिक दीड हजार रुपये असे शुल्क आकारण्यात येणार आहे. कायमस्वरूपी कामगारांच्या पगारातून हे पैसे कपात केले जाणार आहेत, तर अन्य कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे रोख भरावे लागणार आहेत, असे परिपत्रकात म्हटले आहे.
वाचा:
यावरून मात्र आता वाद सुरू झाला आहे. कारखान्याने आपल्याच कारखान्याच्या कामगारांना मोफत लस देणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्याचे पैसे आकारले जाऊ नयेत, असा सूर कामगारांमधून व्यक्त होत आहे. सरकारी केंद्रावर ही लस मोफत मिळत आहे. कारखान्याने अशाच केंद्रामार्फत शिबीर घेऊन ती कामगारांना देणे अपेक्षित होते. ती मिळणार नसेल तर खासगी लस खरेदी करून आपल्या कामगारांना दिली जावी, अशीही अपेक्षात व्यक्त होत आहे. परिपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून तालुक्यात यासंबंधी चर्चा सुरू झाली आहे.
साखर कारखान्याच्या प्रशासनाने म्हटले आहे की, या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढण्यात येत आहे. ही लस कारखान्यामार्फत दिली जात नाही. एका खासगी हॉसिपटलमार्फत ती दिली जाणार आहे. कारखाना फक्त शुल्क वसुलीची हमी देणार आहे. यासाठी नोंदणी केलेल्या कामगारांच्या पगारातून ही रक्कम कपात केली जाईल. सध्या सरकारी केंद्रांवरही लस उपलब्ध होत नाही. खासगीकरणातून लस घेण्यासाठी सध्या पैशाची अडचण आहे. अशा काळात कारखाना हमी घेण्यासाठी पुढे आल्याचे कारखाना प्रशासनाचे म्हणणे आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times