यापूर्वी दीड लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय बिलांचे लेखापरीक्षण करण्यात येत होते. आता सरसकट सर्व बिलांचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यासाठी रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान, आतापर्यंत पुण्यात रुग्णालयांनी घेतलेल्या वैद्यकीय बिलांपैकी सुमारे नऊ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
करोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर रुग्णालयांनी दिलेल्या ८१२५ वैद्यकीय बिलांचे पूर्व लेखापरीक्षण करण्यात आले असून, या बिलांमध्ये आकारलेले सुमारे १२ कोटी ७६ लाख रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.
रुग्णालयांकडून जास्त रकमेची वैद्यकीय बिले आकारल्याच्या तक्रारी प्रशासनाने येत आहेत. त्यांचे पूर्व लेखापरीक्षण करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये उपआयुक्त, सनदी लेखापाल आणि डॉक्टरांचा समावेश आहे. या पथकांकडून आतापर्यंत दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बिलांचे पूर्व लेखापरीक्षण करून रक्कम कमी करण्यात येत होते. त्यानुसार आतापर्यंत ८१२५ बिलांमधील सुमारे १२ कोटी ७६ लाख रुपये कमीही झाले. मात्र आता सरसकट सर्व बिलांचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यामुळे इतरही अनेक रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्यमंत्र्यांकडून नव्या उपक्रमाची घोषणा
राज्यात मासिक पाळीविषयी जनजागृती आणि सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यासाठी ‘उन्नती उपक्रम’ सुरू करण्यात येणार आहे. मासिक पाळी दिवसानिमिताने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची अधिक माहिती आणि अंमलबजावणी याविषयीचा अध्यादेश येत्या दोन दिवसांत काढण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सॅनिटरी पॅडचे वाटप करावे, असं आवाहन करण्यात येणार आहे. मोठ्या कंपन्यांनी जिल्हे दत्तक घ्यावेत, असंही सुचवण्यात आलं आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times