कमलनाथ यांनी केंद्रातील मोदी सरकारवर आणि राज्यातील भाजपच्या शिवराज सिंह सरकारवर टीका केली. करोनाने होणाऱ्या मृत्युंचे आकडे लपवत असल्याचा आरोप कमलनाथ यांनी राज्यातील शिवराज सिंह सरकारवर केला.
‘इंडियन करोना’ वरील वादग्रस्त वक्तव्यावरून आधीच कमलनाथ यांच्यावर टीका झाली होती. आता त्यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं. माझा भारत महान नव्हे, तर भारत बदनाम आहे. सर्वच देशांनी भारतीयांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. तसंच न्यूयॉर्कमध्ये जे भारतीय टॅक्सी चालक आहेत त्यांच्या टॅक्सीत कुणीही बसत नाही असं आपल्याला फोनवर काहींनी सांगितलं, असं कमलनाथ म्हणाले.
भाजपने दिले उत्तर
कमलनाथ यांनी केलेल्या टीकेला भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी प्रत्युत्तर दिलं. माझा भारत महान होता, आहे आणि राहणार. पण चिनी विचार आणि इटिलियन चश्म्याने पाहणाऱ्यांना तो दिसणार नाही, असं कैलास विजयवर्गीय म्हणाले.
सोनिया गांधींनी उत्तर द्यावं- चौहान
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्या टीकेवरून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे. कमलनाथ यांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? याचं उत्तर सोनिया गांधींनी द्यावं. सत्ता गेल्याने कमलनाथ यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. कमलनाथ यांनी याच मायभूमीत जन्म घेतला आणि ते भारत बदनाम म्हणत आहेत. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींना अशीच काँग्रेस हवी होती का? असा सवाल शिवराज सिंह चौहान यांनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times