म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोरेगाव भीमा दंगलीस कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या पुण्यातील एल्गार परिषदेच्या गुन्ह्याचा तपास हा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) गेला असला, तरी या गुन्ह्याची चौकशी ‘विशेष तपास पथका’तर्फे () करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू आहेत. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ नेमण्याबाबत राज्याच्या महाधिवक्त्यांकडे कायदेशीर सल्लागार मागितला असून तो आल्यानंतर ‘एसआयटी’ची स्थापना होईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात स्पष्ट केले. ‘एनआयए’सोबत राज्य सरकारच्या ‘एसआयटी’ची स्थापना झाल्यास या प्रकरणाचा समांतर तपास होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या गुन्ह्याच्या तपास करणारे अधिकारी; तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या बदलीच्या झालेल्या मागणीबाबत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशमुख हे शनिवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे पोलिस आयुक्तालयाला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी पुणे आयुक्तालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी एल्गार परिषदेचा तपास, त्यावरील आक्षेप आणि या गुन्ह्याची चौकशी करण्याबाबत देशमुख यांनी उत्तरे दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्याचा निर्णय घेऊन शरद पवार यांची सूचनाही डावलली आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख म्हणाले, ‘मुख्यमंत्री ठाकरे यांना माझा निर्णय फिरविण्याचा अधिकार आहे, एवढीच माझी भूमिका आहे. मी माझ्याबाबतची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.’ दरम्यान, राज्य सरकारने एल्गार परिषदेच्या गुन्ह्याचा तपास ‘एनआयए’कडे दिला असला, तरी या गुन्ह्याच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ नेमण्याबाबत राज्याच्या महाधिवक्त्यांकडे कायदेशीर सल्लागार मागितला आहे. हा सल्ला आल्यानंतर याबाबत ‘एसआयटी’ नेमण्याचे आदेश राज्य सरकार देईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

एल्गार परिषदेच्या गुन्ह्याच्या तपास करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आली आहे. याबाबतही देशमुख यांना छेडण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, ‘या अधिकाऱ्यांच्या बदलीच्या झालेल्या मागणीबाबत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे. तसेच, आपल्याला या तपासाबाबत असलेल्या शंकांबाबत पुन्हा आढावा घेणार आहे.’

‘कोरेगाव भीमा’च्या दंगलीच्या घटनेचा तपास अद्यापही सुरू असून त्यातील आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल झालेले नाही. या गुन्ह्यांत मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरूजी यांना आरोपी करण्यात आले आहे. याबाबत बोलताना देशमुख म्हणाले, ‘या गुन्ह्याच्या तपासाबाबत पुणे ग्रामीण पोलिसांच्या अधीक्षकांशी चर्चा केली आहे. त्यांनी या घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. त्यांनी या तपासाबाबत आवश्यक काही परवानगी मागितली, तर त्यांना देण्यात येतील,’ असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

राज्य सरकारने एल्गार परिषदेच्या गुन्ह्याचा तपास ‘एनआयए’कडे दिला असला, तरी या गुन्ह्याच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ नेमण्याबाबत राज्याच्या महाधिवक्त्यांकडे कायदेशीर सल्लागार मागितला आहे. हा सल्ला आल्यानंतर याबाबत ‘एसआयटी’ नेमण्याचे आदेश राज्य सरकार देईल.

अनिल देशमुख, गृहमंत्री

………………..

गृहमंत्री म्हणाले…

-फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार

-मुंबई पोलिस आयुक्तांना क्लीन चिट

-प्रत्येक नव्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक

-आठ हजार पोलिसांची भरती, सात हजार सुरक्षा रक्षक

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here