केंद्रातील मोदी सरकारला दुसऱ्यांदा सत्तारूढ होऊन दोन वर्ष पूर्ण झालेत. या निमित्ताने जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य शासनातील मतभेदांमुळेच ही वेळ
आमदार गिरीश महाजन यांनी सांगीतले की, राज्यात भाजप सरकार असताना मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण देण्यात आले होते. आरक्षणाच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण बाजू तयार करण्यात आली होती. त्यानंतरच आरक्षण दिले गेले होते. तेव्हा उच्च न्यायालयात आरक्षणाला आव्हान देण्यात आले होते. मात्र, सरकारने योग्य बाजू मांडल्याने ते आरक्षण टिकले होते. दुर्दैवाने आमचे सरकार गेले. त्यानंतर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार योग्य पद्धतीने बाजू मांडू शकले नाही. म्हणून आरक्षण गेले. आरक्षण नाकारण्यात आले, त्याला भाजप सरकार जबाबदार नाही. महाविकास आघाडी सरकारचे वकील न्यायालयात बाजू मांडायला कमी पडले. म्हणूनच हे आरक्षण नाकारण्यात आले, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.
राज्य सरकार तीन पक्षांचे असल्याने त्यांच्यात एकमेकांमध्ये मतभेद आहेत. मंत्रीमंडळातील अर्धे मंत्री आरक्षणाला विरोध करतात. म्हणूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोपही गिरीश महाजन यांनी यावेळी केला. छत्रपती संभाजीराजे भोसले मराठा आरक्षणासंदर्भात येत्या सात तारखेला काय करतात, काय भूमिका मांडतात, ते पाहूया, असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
मुक्ताईनगरातील पक्षांतरावर मौन
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या भाजपच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायत भाजपच्या हातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. या संदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता गिरीश महाजन यांनी मौन बाळगले.
दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक किटचे वाटप
दिव्यांग बांधवांना भाजपच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. आमदार गिरीश महाजन व सुरेश भोळे यांच्या हस्ते हे कीट देण्यात आले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times