: सरकारी कार्यालयांमध्ये होणारा भ्रष्टाचार नेहमीच चर्चिला जातो. मात्र फक्त पैसे घेऊनही काही लोकांचा हव्यास संपत नाही. याचंच एक उदाहरण बुलडाण्यातून समोर आलं आहे. प्लॉटची नोंद घेऊन त्याची फेरफार देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेऊनही दारू व मटणाची पार्टी घेणाऱ्या लाचखोर मंडळ अधिकारी व तलाठ्याला बुलडाण्याच्या एसीबीने रंगेहात पकडले.

ही कारवाई शुक्रवारी २८ मे रोजी रात्री १० वाजता खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर शिवारात करण्यात आली आहे. लाखनवाड्याचा मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर ( ५२ , रा . गजानन कॉलनी , खामगाव ) , आणि शिरला नेमानेचा तलाठी बाबुराव उखर्डा मोरे ( ३६ , रा . किन्ही महादेव ता . खामगाव ) अशी लाचखोरांची नावे आहेत .

शिर्ला नेमाने येथे कार्यरत तलाठी बाबुराव उखर्डा मोरे यांनी शिरला नेमाने येथील तक्रारदारच्या भावाच्या नावाने खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद सातबारावर घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी १० हजार रुपये व दारू मटण पार्टीची मागणी केली होती. यातील १० हजार रुपये शुक्रवारी दुपारीच अधिकाऱ्यांना देण्यात आले होते व रात्री दारू व मटणाच्या पार्टीचा बेत ठरला होता. तक्रारदाराने ही माहिती ‘एसीबी’ला दिली.

या माहितीच्या आधारे ‘एसीबी’ने सापळा रचला आणि पिंप्री धनगर शिवारातील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील झोपडीसमोर रात्री १० वाजता दोन्ही लाचखोरांना मटणावर ताव मारताना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन मद्याच्या बाटल्या व मांसाहारी जेवणाचे पदार्थ जप्त करण्यात आले.

ही कारवाई बुलडाण्याचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी, पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, पो.ना. विलास साखरे , प्रवीण बैरागी , मोहम्मद रिजवान, पोलिस शिपाई विनोद लोखंडे, अझरुद्दीन काझी, चालक पोलिस कॉन्स्टेबल नितीन शेटे आणि शेख अर्षद यांनी पार पाडली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here