ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, अशी नवी गर्जना करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘राज्यात सत्ता नसल्याने भाजप नेते असह्य झाले आहेत. आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत आहे. आमचे सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं,’ असा सवाल यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थिती आणि उपाययोजनांच्या आढावा बैठकीनंतर अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सरकार कधीपर्यंत टिकणार? अजित पवारांनी दिलं उत्तर
‘जोपर्यंत तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार राहणार आणि जनतेच्या हिताचे काम करणार आहे. राज्यात आपण सत्तेत नसल्याने भाजप नेत्यांना असह्य झाले आहेत, नव्हे त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत आहे. कार्यकर्त्यांनी सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत राहतात,’ असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील विरुद्ध अजित पवार असा सामना रंगत आहेत. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल नाहीतर वेळ निघून जाईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर अजित पवार यांनी उपरोधिकपणे स्वतःच रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली. अजित पवारांच्या या भूमिकेवर टीका करत मराठा समाजाला दिलासा दिला नाही तर समाज त्यांना तसेही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times