पुणे: खेड-शिवापूर टोलनाका हटवण्यासाठी आज पुण्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ‘रामकृष्ण हरी’च्या गजरात अभिनव पद्धतीने खेड-शिवापूर टोलनाक्यावर प्रचंड रास्तारोको केला आहे. त्यामुळे या टोलनाक्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याने कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार या सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, चिघळू नये म्हणून या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

२०१०मध्ये हा टोलनाका सुरू करण्यात आला होता. मात्र तो अजूनही सुरू ठेवण्यात आल्याने येथील ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. ज्या रस्त्यासाठी टोलनाका तयार करण्यात आला तो रस्ताही तयार झालेला नाही. शिवाय रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले असून त्यामुळे या रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच रोज या नाक्यावर वाहनांच्या दोन-दोन तास रांगा लागल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून हा टोलनाका हटवावा यासाठी सर्वपक्षीय टोलनाका हटाव समितीने आज खेड-शिवापूर टोलनाक्यावर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. हातात काळे झेंडे आणि फलक घेऊन सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थही या आंदोलनात उतरल्याने या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. या आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. तर आंदोलन चिघळू नये म्हणून पोलिसांनी टोल कंपनीशी संपर्क साधल्याने तुर्तास या टोलनाक्यावर शुल्क आकारणी बंद करण्यात आली असून वाहने मोफत सोडण्यात येत आहेत. आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितलं.

कीर्तन, भजन गाऊन आंदोलन

दरम्यान, आंदोलकांनी कोणताही अनुचित प्रकार न करता खेड-शिवापूर टोलनाक्यावर भजन, कीर्तन करत अभिनव पद्धतीने आंदोलन सुरू केलं आहे. टाळ, मृदुंगाच्या तालात ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या नामाचा जयघोष करत आंदोलकांनी हे आंदोलन करत आहेत.

सुविधा द्या नाही तर टोल बंद करा: सुळे

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. सुविधाच नाहीत तर टोल कशाचा भरायचा? असा सवाल करतानाच आधी टोलनाका बंद करा. मगच पुढची चर्चा करू, असं सुळे यांनी सांगितलं. टोलसाठी पैसे भरायला आमचा नकार नाही, पण सुविधाच नसतील तर पैसे का म्हणून भरायचे, असा सवालही त्यांनी केला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा काल फोन आला होता. त्यांनी टोलबाबत दोन-चार सूचना केल्या आहेत. सर्वपक्षीय आंदोलकांशी चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here