शिर्डी विधानसभा मतदार संघात कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देणा-या सरकारी वैद्यकीय आधिकारी, खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचा-यांसह रुग्णवाहिका चालक, सफाई कामगार, आशा सेविका आणि नर्सिंग स्टाफचा प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला. विखे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सेवा सप्ताहाच्या निमित्ताने भाजपाचे कार्यकर्ते कोविड योध्यांना घरी जावून सन्मानित करणार आहेत. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारला ७ वर्षे पूर्ण होत आहेत. या कार्यकाळात देशाला बलशाली बनविण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतलेच, परंतू करोना संकटानंतर हा देश पुन्हा आत्मविश्वासाने उभा राहावा म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सरकारी आधिकारी आणि कर्मचा-यांनी निरपेक्ष भावनेतून आणि मानवी दृष्टीने केल्यामुळेच सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत देश पुन्हा गतीने पुढे जात आहे.’
राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले, ‘राज्यात ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्यांनी फक्त मुंबई पुरते निर्णय घेतले. ग्रामीण महाराष्ट्राकडे दुर्लक्षच केल्यामुळे आरोग्य सुविधा नागरिकांना मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. आघाडी सरकारचे निर्णय फक्त कागदोपत्री झाले. महाराष्ट्र राज्य ऑक्सिजन निर्मितीत अग्रेसर मानले जाते. तरीही केंद्र सरकारवरच अवलंबून राहणारे आघाडी सरकार करोना संकट रोखण्यात अपयशी ठरले. सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूंची संख्या ही महाराष्ट्रात आहे. या संकटात आघाडी सरकार ना सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहीले ना कोणती मदत यांनी मिळवून दिली. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यांनी जे निर्णय घेतले त्याचा कोणताही लाभ ग्रामीण महाराष्ट्राला होणार नाही. त्यामुळेच आघाडी सरकार हे फक्त घोषणा करत राहिले. या राज्यातील जनतेला संकटाच्या खाईत लोटून देणा-या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,’ असेही विखे पाटील म्हणाले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, प्रतापराव जगताप, कैलास कोते, अभय शेळके, नितीन कोते, अशोक गायके, सुजित गोंदकर, रवि कोते, स्वानंद रासणे, भाजयुमोचे सतिष बावके यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या वतीने ‘सेवाही संघटन’ या उपक्रमातून गाव पातळीवर आरोग्य सेवांचे उपक्रम तसेच कोविड योध्यांना सन्मानित करण्यात आले. शिर्डी विधानसभा मतदार संघातील आरोग्य, महसूल तसेच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या सुमारे १५००हून अधिक करोना योध्यांना सन्मानित करण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times