अमरावती : करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ऐन बोहल्यावर चढण्याच्या वेळीच वराची रवानगी तालुका प्रशासनाने कोविड सेंटरमध्ये केली. मात्र, पॉझिटिव्ह आल्यानंतरदेखील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला हा वर बोहल्यावर चढण्याची घाई करत होता. या घटनेची चर्चा सध्या गावभर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका युवकाचं लग्न गुरुवारी (दि.२७) आयोजित केलं होतं. पण कोविडच्या नियमानुसार, लग्न समारंभासाठी करोना चाचणी करणं आवश्यक असल्यानं नवऱ्या मुलाने चाचणी केली. त्यात तो करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल समोर आला. करोना संसर्गाचा धोका माहिती असतानाही हा उतावळा वर बोहल्यावर चढून लग्न करतोच, असा अट्टहास धरून बसला होता.

कुटुंबियांनी त्याला समाजावलं, परंतु त्याच्या अट्टहासामुळे सगळ्यांची पंचाईत झाली. अखेर शेवटी नवरोबाला बोहल्यावर न चढता प्रशासनाच्या सजगतेने कोविड सेंटरची पायरी चढावी लागली. पण यामुळे ‘हट्टी नवरोबा’ हा विषय मात्र या परिसरात चांगलाच चर्चेला आला.

प्रशासनाच्या निर्देशानुसार, रहिमापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या परिसरातील या वराने २ मे रोजी रॅपिड अँटिजेन चाचणी केली. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आल्याने त्याने पुन्हा २५ मे रोजी आरटीपीसीआर चाचणी केली. त्यामध्ये तो निगेटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या मनात लगीन घाई सुरू झाली.

लग्न पुढे ढकलण्याविषयी त्याला अनेकांनी समजावलं पण तो कुणाचेच ऐकायला तयार नव्हता. या युवकाचा विवाह गुरुवारी होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यांनीही त्याला विवाह करण्यास मनाई केली होती. हा विवाह तात्पुरता रद्द करण्यास अनेकांनी त्याला सुचवले होते. दक्षता समितीने सुद्धा त्याला समजावले होतं, परंतु तो कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता.

यामुळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर डोंगरे यांनी तहसीलदार अभिजित जगताप आणि ठाणेदार सचिन इंगळे यांच्याशी चर्चा करत याबाबत माहिती दिली. खबरदारीचा उपाय म्हणून शेवटी रहिमापूर पोलीस, आरोग्य विभाग आणि तहसीलदार अभिजित जगताप यांनी लग्नासाठी उतावीळ झालेल्या नवरदेवाची कोविड सेंटरमध्ये रवानगी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here