नागपूरः करोना विषाणू प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या नागपुरातील करोना संसर्गाचा विळखा आता सैल होत आहे. संशयितांमधून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची १७ टक्क्यांवर गेलेली सरासरी देखील आता २ टक्क्यांपर्यत गडगडली आहे. करोनाचा हा वाढता विळखा उतरणीला लागल्याने नागपुरकरांसाठी रविवारचा दिवस सकारात्मक उर्जा देणारा ठरला.

करोनाचा प्रादुर्भाव झाल्याच्या संशयातून रविवारी दिवसभरात १० हजार ३९१ जणांच्या घशातील स्त्राव नमुने तपासले गेले. त्यातील २२० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित ९९६१ संशयितांच्या स्वाब नमुन्यांमध्ये कुठल्याहीप्रकारचा विषाणू आढळला नाही. तपासलेल्या नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्यांची संख्या पाहता शहरातील पॉझिटिव्हिटिचा दरही आता २.११ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर हा सरासरी दर १७ टक्क्यांच्या वर गेला होता. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत असताना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही ओसरत आहे. रविवारी दिवसभरात उपचार घेत असलेले ५६७ कोरोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून सुटी देऊन घरातच विलगीकरणात पाठविण्यात आले.

गेल्या वर्षी ११ मार्चला शहरात कोव्हिडच्या पहिल्या रुग्णाचे निदान करण्यात आले होते. तेव्हापासून रविवारपर्यंत शहरातील ३ लाख ३३ हजार ३१८ नागरिकांना करोनाचा विळखा पडला आहे. त्यातील ३ लाख २४ हजार १ रुग्णांनी या विषाणूवर उपचाराने मातही केली आहे. मात्र या घडामोडीत कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या ५ जणांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांची विषाणूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. त्यामुळे शहरात आतापर्यंत करोनाची बाधा होऊन मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५२४४ इतकी नोंदविली गेली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here