म. टा. प्रतिनिधी, नगर: कोविड केअर सेंटरमध्ये आगळेवेगळे उपक्रम राबवून स्वत:ला रुग्णसेवेत गुंतवून घेतलेले पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मात्र, सोशल मीडियातून बदनामी केल्याचा आरोप करून लंके यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याला एक कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस पाठविली आहे. यावर मनसेनेही त्यांच्यावर पलटवार केला असून स्वत:ला फकीर म्हणवून घेणाऱ्या लंके यांच्याकडे एवढी संपत्ती आली कोठून? असा सवाल मनसेने केला आहे.

मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार आणि आमदार लंके यांच्यात हा वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पवार यांनी आमदार लंके यांनी आपल्याला फोनवर बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप केला होता. याची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली होती. लंकेंवर आरोप करणारा व्हिडिओही पवार यांनी प्रसारित केला होता. त्यामध्ये लंके यांच्यासोबतच ते चालवित असलेल्या कोविड केअर सेंटरसंबंधीही आरोप केले होते. शिवाय लंके यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. यानंतर पवार यांच्याविरूद्ध गुन्हाही दाखल झाला.

आता लंके यांनी वकिलामार्फत मनसेचे पवार यांना एक कोटीच्या नुकसान भरपाईची नोटीस धाडली आहे. पवार यांनी व्हिडिओ प्रसारित केल्याने आपली आणि आपल्या कामाची बदनामी झाली आहे. कोविड सेंटरच्या कामामुळे देश-विदेशात आपली चांगली प्रतिमा तयार झाली असून त्याला पवार यांच्या व्हिडिओमुळे धक्का पोहचला आहे. त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी आणि एक कोटींची नुकसान भरपाई द्यावी, असे नोटीशीत म्हटले आहे.

यावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन भुतारे यांनी म्हटले आहे की, ‘स्वत:ला फकीर म्हणून घेणाऱ्या लंके यांनी एक कोटी रुपयांचा हा दावा ठोकला कसा? करोनाच्या परिस्थितीत लंके यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. मात्र, मनसेच्या पदाधिकाऱ्यावर असा दबाव टाकणे मनसे कदापी खपवून घेणार नाही. मनसेचे पदाधिकारी पवार यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू.’

पवार म्हणाले की, ‘लंके यांना फकीर म्हटले जाते. लोक त्यांचे पाय धुवू लागले आहेत. आता फक्त ते पाणी प्यायचे राहिले आहे. सामाजिक काम करणारा कार्यकर्ता असा आईवर शिव्या देत नाही. मला आणि माझ्या पक्षाला त्यांनी शिव्या दिल्या आहेत. यावरून त्यांच्या कोविड सेंटरमध्ये काय सुरू असेल, याचा अंदाज येतो. त्यामुळे प्रशासनाने हे कोविड सेंटर ताब्यात घ्यावे.’

आमदार लंके यांनी पवार यांना पाठविलेल्या नोटिशीत हे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ‘पवार यांनी आपल्याशी फोनद्वारे संपर्क केलेला नाही. त्यांशी फोनवर काहीही बोलणे झालेले नाही. केवळ राजकीय द्वेषापोटी पारनेर तालुक्यातील भाजपच्या एका पुढाऱ्याशी संगनमत करून ही बनावट क्लीप तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे आपली देशभर बदनामी करण्यात आली आहे,’ असे लंके यांनी नोटीशीत म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here