राज्यात करोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात येत आहे. ५० ते ६० हजारांवर पोहोचलेली रुग्णसंख्या आता नियंत्रणात येत आहे. लॉकडाऊन व लसीकरण यामुळं करोना संसर्गाला आळा बसवण्यात यश येत असल्याचं चित्र आहे. आज राज्याला करोनासंदर्भात मोठा दिलासा मिळाला आहे. कालच्या तुलनेत आज नवीन रुग्णांच्या आकड्यात विक्रमी घट झाली आहे. त्याचबरोबर राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात करोनाची दुसऱ्या लाटेचा संसर्ग वाढल्यानंतर आज नवीन रुग्णसंख्येत विक्रमी घट झाली आहे. आज १८ हजार ६०० नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, गेल्या २४ तासांत ४०२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर १. ६५ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३, ४८,६१,६०८ चाचण्यांपैकी ५७, ३१,८१५ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
आज राज्यात करोनामुक्त रुग्णांचा आकडा वाढला आहे. २२ हजार ५३२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यात आजपर्यंत ५३ लाख ६२ लाख ३७० करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं राज्याचा रिकव्हरी रेट ९३.५५ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात १९ लाख ९८, ९७६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १२,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times