मुंबईः तिसरी लाट तारीख सांगून येणार नाही. ते आपल्या वागणुकीवर आणि नियमांच्या पालनावर अवलंबून आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आताचा करोना व्हायरस संसर्ग अधिक वेगाने करतो, झपाट्याने पासरतो आणि रुग्ण बरे होण्यास वेळ लागतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत नागरिकांना महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाइव्हद्वारे जनतेसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. करोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी केंद्र सरकारने आज एक योजना जाहीर केल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की राज्य ही अशा बालकांसाठी योजना तयार करत असून त्यांचे पुर्ण पालकत्व राज्यसरकार स्वीकारणार आहे. आयुष्याची वाटचाल करतांना ही बालके पोरकी होणार नाही, त्यांच्या प्रत्येक पावलागणिक शासन त्यांच्यासोबत राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

उपलब्धतेप्रमाणे लस

तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना करोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने त्यासाठीचे नियोजन शासनाने आधीच सुरु केल्याचे सांगतांना त्यांनी बालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सची माहिती दिली. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास शासन समर्थ असून एक रककम देऊन ही लस खरेदीची राज्याची तयारी असली तरी लसीची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता जस जसी लस येईल तस तशी सर्वांना लस उपलब्ध करून दिली जाईल असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले त्यांनी आतापर्यंत २.२५ कोटी नागरिकांना लस दिल्याची माहिती दिली.

तिसऱ्या लाटेचे निमंत्रक होऊ नका

करोनाची दुसरी लाट सरकारी योजना नाही ज्याच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनाची भाषा केली जावी हे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या लाटेचे निमंत्रक न होता अशी भाषा करणाऱ्यांनी ज्या कुटुंबांनी आप्त स्वकीय गमावले, कर्ते गमावले अशा कुटुंबांच्या मदतीसाठी कोविड योद्धे होऊन काम करावे, असे आवाहन केले.

करोना नियमांचे पालन करा

राज्यात नवीन ऑक्सीजनचे प्लांट आपण उभे करत आहोत. यासाठी ३ महिने ते १८ महिन्याचा कालावधी लागेल तोपर्यंत आपल्याला अतिशय सावधपणे पुढे जावे लागत असल्याचे सांगतांना राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केले तसेच सहकार्य पुढे करावे, करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांची उपलब्धता, त्याची सध्याची स्थिती याचीही माहिती दिली.

करोना स्थितीचे तुलनात्मक विश्लेषण

मुख्यमंत्र्यांनी १९ सप्टेंबर २०२० ची आणि आजची करोना रुग्णस्थिती याची तुलनात्मक आकडेवारी सांगितली. ते म्हणाले की, अजूनही हा आकडा खुप खाली गेलेला नाही. राज्यात १९ सप्टेंबर २०२०ला दैनंदिन रुग्णसंख्या २४ हजार ८८६ होती ती आज २४ हाजर ७५२ आहे. तेंव्हा सक्रिय रुग्ण ३ लाख १ हजार ७५२ होते आज ३ लाख १५ हजार ४२ आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे तेव्हाचे प्रमाण ७८ टक्के होते जे आज ९२.७६ टक्के आहे. मृत्यूदर ही त्यावेळेसच्या २.६५ वरून १.६२ टक्के एवढा कमी झाला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here