मुंबईः मेट्रो प्रवासाचा दुसरा टप्पा अखेर सुरु होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) आजपासून डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनदरम्यान चाचणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थित हा सोहळा पार पडला आहे.

मुख्यमंत्री व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मेट्रो चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी आकुर्ली स्थानकात खास आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर, छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) च्या टर्मिनल १ (टी १) आणि टर्मिनल २ (टी २) ला पोहोचण्यासाठी एमएमआरडीएकडून भुयारी आणि उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. २४ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनदरम्यान आगामी चार महिने ही चाचणी प्रक्रिया विविध टप्प्यांत पार पडणार आहे. एकूण २० किलोमीटरच्या मार्गावर या चाचण्या सुरू होतील. मेट्रो २ अ (दहिसर पूर्व ते डी.एन.नगर) आणि मेट्रो ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या मार्गावरील मेट्रो दोन टप्प्यात धावणार आहे. ऑक्टोबरमध्ये पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असून दुसरा टप्पा जानेवारी २०२२ पर्यंत सुरू होईल.

करोनासंकटात मनुष्यबळाच्या अनुपलब्धतेपासून, कडक निर्बंधांचा परिणाम मेट्रो कामांवर होत होता. मात्र सर्व अडथळ्यांवर मात करून मेट्रो कामे वेगाने पूर्ण करण्यात आली. यामुळे पूर्व नियोजनानुसार पार पडत असल्याचे एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गांवर वातानुकूलित चालकविरहीत मेट्रो धावेल. मात्र मुंबईकरांना सवय व्हावी यासाठी मोटरमनची नियुक्ती या मेट्रोमध्ये करण्यात येणार आहे. सध्या एक गाडी ताफ्यात असून आणखी दहा गाड्या ऑक्टोबरआधी दाखल होतील, असंही सांगण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here