मुंबई मेट्रोच्या चाचणीवरुन राजकारण सुरु झालं आहे. ट्रायल रनच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी आकुर्ली स्थानकाबाहेर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. करोना संकटकाळात जाहिरातबाजीतून जनतेच्या पैशाचा चुराडा कशासाठी?, असा सवाल भाजपनं केला आहे. मेट्रो प्रकल्पाची बर्बादी करणारे मुख्यमंत्री कोणत्या अधिकाराने उद्घाटनाची चमकोगिरी करतायत? हा प्रकल्प रखडवल्याबद्दल त्यांनी मुंबईकरांची माफी मागायला हवी. परंतु करोनाच्या काळात न केलेल्या कामाची ते जाहिरातबाजी करतायत, अशी टीका भाजपनं केली आहे.
डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनदरम्यान चाचणी
डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनदरम्यान आगामी चार महिने ही चाचणी प्रक्रिया विविध टप्प्यांत पार पडणार आहे. एकूण २० किलोमीटरच्या मार्गावर या चाचण्या सुरू होतील. मेट्रो २ अ (दहिसर पूर्व ते डी.एन.नगर) आणि मेट्रो ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या मार्गावरील मेट्रो दोन टप्प्यात धावणार आहे. ऑक्टोबरमध्ये पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असून दुसरा टप्पा जानेवारी २०२२ पर्यंत सुरू होईल. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गांवर वातानुकूलित चालकविरहीत मेट्रो धावेल. मात्र मुंबईकरांना सवय व्हावी यासाठी मोटरमनची नियुक्ती या मेट्रोमध्ये करण्यात येणार आहे. सध्या एक गाडी ताफ्यात असून आणखी दहा गाड्या ऑक्टोबरआधी दाखल होतील, असंही सांगण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times