नवी मुंबई: शिवसेनेने सत्तेसाठी आपली सर्व तत्व गुंडाळून ‘मातोश्री’वरील एका कोपऱ्यात ठेवली आहेत आणि हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची घोर फसवणूक करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असा निर्धार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत आयोजित भाजपच्या अधिवेशनाला पाटील संबोधित करत होते.

विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला सत्ता स्थापनेसाठी आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनण्यासाठी स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र, स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याच्या महत्वाकांक्षेसाठी या जनादेशाचा अनादर शिवसेनेने केला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाच्या तत्वाला मूठमाती दिली. सत्तालालसेपायी महापुरुषांचा अपमानही आज सहन करत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान काँग्रेसकडून सातत्याने केला जात आहे. पण त्यावर शिवसेना बोलत नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार करत आहे. पण त्यावरही शिवसेना नेते बोलायला तयार नाही. सत्तेसाठी शिवसेनेने आपली सर्व तत्वं गुंडाळून मातोश्री बंगल्याच्या कोपऱ्यात ठेवली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

महाजनादेशाचा अपमान करुन सत्तेत आलेलं महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची घोर फसवणूक करत आहे. शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचा शब्द या सरकारने दिला होता. पण तो शब्द पाळला नाही. आज राज्यात महिला असुरक्षित आहेत. राजरोसपणे महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या काळात गुन्हेगारांना शिक्षेचा कनव्हिक्शन रेट अतिशय उत्तम होता. त्यामुळे प्रत्येकाला कायद्याचा धाक होता. पण आज राज्यात कुणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. आज राज्यातील जनतेची ज्या प्रकारे फसवणूक सुरु आहे, त्यामुळे आता सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करणार आहे. भाजप राज्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल. यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा निर्धार त्यांनी केला.

आगामी नवी मुंबई महानगरपालिका आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांसह सर्व विरोधक एकत्र येतील. या तिघांविरोधात भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढेल, आणि दोन्ही महापालिकांमध्ये भाजप विजयी होईल, आणि आपला महापौरच विराजमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here