विविध सण, उत्सवांचे बंदोबस्त, मोर्चे, नेत्यांची सुरक्षा, रस्ते, चौक, महामार्गावर ड्युटी करत असताना पोलिसांना सतत ऊन, वारा, पावसात राहावे लागते. विश्रांती व आडोशासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध नसल्याने कुठेतरी आडोसा घ्यावा लागतो. महिला पोलीस कर्मचाऱ्यांची तर ड्युटी दरम्यान अधिक कुचंबना होते. पोलिसांची ड्युटी दरम्यान होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन संजय राठोड यांनी मुंबई तथा महानगरात पोलिसांसाठी वापरात येत असलेल्या ‘पोर्टेबल ऑफिस कॅबिन’ ची संकल्पना मांडली.
या संदर्भात पोलीस अधीक्षकांना प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. या प्रस्तावानुसार, जिल्हा पोलीस दलांतर्गत येणाऱ्या १० नगर परिषदांना प्रत्येकी दोन तसेच बंदोबस्ताकरीता सहा अशा २५ पोर्टेबल ऑफिस कॅबिन खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ७५ लाख ४३ हजार ६०० रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, आर्णी, वणी, पांढरकवडा, घाटंजी, उमरखेड व पुसद या १० नगरपरिषदांना प्रत्येकी दोन आणि वेळोवेळी येणाऱ्या VVIP बंदोबस्त, आंदोलने, मोर्चे, धरणे, संप, रस्त्यावरील बंदोबस्त यासाठी सहा अशा २६ पोर्टेबल ऑफिस कॅबिन या निधीतून खरेदी करण्यात येणार आहे. या कॅबिन कुठेही हलविता येणार असल्याने पोलिसांसाठी सोईचे होणार आहे. बंदोबस्तादरम्यान फ्रेश होण्यासाठी या कॅबिनचा वापर करता येईल. या कॅबिनमुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी सोय होणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times