: करोना प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर जनजीवन सुरळीत होण्यासाठी राज्यातील अनेक भागात निर्बंध कमी केले जात आहेत. अमरावती आणि जिल्ह्यातही नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यात लागू असलेल्या संचारबंदीत दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी नवाल यांनी आज जारी केला. या आदेशानुसार जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांसह आता बिगर जीवनावश्यक सेवाही मर्यादित वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, पुन्हा रुग्ण वाढू नयेत यासाठी प्रत्येकाने दक्षता घेत नियम कसोशीने पाळावेत, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

अमरावतीत नवे नियम कोणते?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, किराणा, भाजीपाला, बेकरी, चिकन, मासे आदी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बिगरजीवनावश्यक एकल दुकानेही (मॉलमधील नव्हे) शनिवार व रविवार वगळता सकाळी ७ ते २ या वेळेत सुरू राहतील. उपाहारगृहांनाही सकाळी ११ ते ७ या वेळेत घरपोच सेवेची परवानगी देण्यात आली आहे.

रास्त भाव दुकानेही सकाळी ७ ते ३ या वेळेत सुरू राहतील. नागरिकांना दुपारी ३ नंतर वैद्यकीय कारण व इतर आवश्यक कारणांशिवाय बाहेर पडण्यास मनाई आहे. कृषी बाजार समित्या व त्यांचे बाजार सुरु राहतील, तसेच कृषी सेवा केंद्रे सकाळी ७ ते दुपारी ३ सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयांना २५ टक्के कर्मचारी उपस्थितीसह काम करता येईल. बँका, पतसंस्था, पोस्ट ऑफिस त्यांच्या वेळेत सुरु राहील. दवाखाने व औषधालये पूर्णवेळ सुरु राहतील.

सीमावर्ती ठिकाणी नाकेबंदी करून कोविड निगेटिव्ह रिपोर्ट नसलेल्या वाहनधारकांना प्रवेश नाकारण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. आपत्कालीन व वैद्यकीय कारणांसाठी वाहनांना परवानगी आहे. मालवाहतूक पूर्णवेळ सुरु राहील.

सर्व प्रकारच्या व्यापारी संघटना, नागरिक यांनी जास्तीत जास्त घरपोच सुविधेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न लावल्यास ७५० रुपये दंड, दुकानांत सोशल डिस्टन्स न पाळल्यास दुकानदारांना ३५ हजार दंड व मंगल कार्यालयात लग्नसमारंभ आयोजित केल्यास ५० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. साथ नियंत्रणाबाबत दर शनिवारी आढावा घेऊन आवश्यक तिथे निर्बंध लागू किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

गडचिरोलीमध्ये नव्या आदेशानंतर काय स्थिती असणार?
गडचिरोली जिल्ह्यात करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून निर्बंध लावण्यात आले होते. यामध्ये काही प्रमाणात जिल्हयात शिथिलता देण्यात आली आहे. अर्थचक्राला गती देण्याबरोबरच कोरोना संसर्ग रोखणे अशी दुहेरी जबाबदारी आता आपल्याला पार पाडावी लागेल असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

असे असतील नवे नियम :
– विविध दुकाने आस्थापना सुरू करत असताना वेळांमध्ये बदल करून तो आता सकाळी ७ ते दुपारी २ असा राहणार आहे.
– आधी प्रमाणे आत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ सुरू राहतील.
– तथापि इतर प्रकारच्या दुकानांमध्ये गर्दी टाळण्यासाठी दोन भागात सुरू करण्यात आले आहेत.
– यात मंगळवार व गुरूवार कपडे, चप्पल, सौंदर्य प्रसाधने, जनरल स्टोअर्स व लहान मुलांची खेळण्याची दुकाने सुरू असतील, तर
– बुधवार व शुक्रवार वरील उल्लेख केलेली दुकाने बंद राहतील व इतर दुकाने सुरू असतील
– यामध्ये काही बाबींना अजूनही प्रतिबंधीत ठेवण्यात आलं आहे
– यात सलून, ब्युटी पार्लर, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, क्रीडा संकूल बंदच राहतील
– पार्क, गार्डन, उद्याने व सिनेमागृह बंदच राहतील, पानटपरी/पानठेले, आठवडी बाजार, गुजरी बंदच असेल
– हॉटेल, उपहारगृह, खानावळही बंदच राहिल मात्र पार्सल व घरपोच सुविधा सुरू राहील.
– धार्मिक स्थळे बंदच असतील
– कृषीविषयक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहतील
– शुक्रवार दुपारी २ वाजलेपासून मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत आत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून सर्व बंद राहतील.
– ई कॉमर्स सेवा सुरू सुरू करण्यात येत असून घरपोच सेवा देण्यास मुभा असेल.

दरम्यान, ‘ब्रेक द चैन’ अंतर्गत अर्थचक्राला गती देण्यासाठी निर्बंध कमी करत असताना मुख्यत: दुकानदारांची जबाबदारी जास्त आहे. दुकान असोशिएशनने कोरोना संसर्गाबाबत सर्व खबरदारींचे पालन करणार असल्याचे मान्य केलं आहे. तोंडाला मास्क लावणे, शारीरिक अंतर पाळणे तसेच दुकानांमध्ये ५ पेक्षा जास्त गर्दी होऊ नये यासाठी लोकांबरोबर दुकानदारांनी प्रयत्न केलेच पाहिजे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here