म. टा. प्रतिनिधी, नगर: पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी २५ लाखांचे कर्ज प्रकरण बँकेकडून लवकर मंजूर करून देण्यासाठी लाभार्थ्याकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा खादी ग्रामोद्योग विभागाचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला. रमेश श्रीहरी सुरुंग (वय ४५) असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ग्रामीण भागात रोजगार सुरू करण्यासाठी मदत मिळून देणाऱ्या या सरकारी योजनेची अंमलबजावणी कशी चालते, हे यावरून स्पष्ट होते.

श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील एका नव उद्योजकाने जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती योजने अंतर्गत पेव्हर ब्लॉक व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. त्यासाठी २५ लाख रुपयांचे कर्ज प्रकरण सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र बँकेच्या हंगेवाडी येथील शाखेत दाखल केले. मात्र, ते बराच काळ प्रलंबित होते. त्यामुळे त्यांनी याची जबाबदारी असलेल्या खादी ग्रामोद्योग विभागाच्या कार्यालयात संपर्क साधला. तेथे अधिकारी सुरुंग यांनी या कामासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच दिल्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून तातडीने कर्ज प्रकरण मंजूर करून घेतो, तसेच अनुदानही मिळवून देतो, असे सुरुंग यांनी सांगितले.

यासंबंधी नवउद्योजकाने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात संपर्क साधला. त्यानुसार पथकाने लाचेच्या सापळ्याची तयारी केली. प्रथम खरंच लाचेची मागणी केली आहे का, याची पडताळणी करण्यात आली. तक्रारदारासोबत पाठविण्यात आलेल्या पंचासोबत सुरुंग यांनी लाचेची मागणी केली. त्यानंतर पथकाने सापळा रचला. खादी ग्रामोद्योगचे कार्यालय नगरच्या बाजार समितीच्या आवारात आहे. तेथे हा सापळा रचण्यात आला. तेथे अधिकारी सुरूंग यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवरे, पोलीस निरीक्षक करांडे, पोलीस कर्मचारी विजय गंगूल, रवींद्र निमसे, राधा खेमनर, संध्या म्हस्के, राहुल सपट यांच्या पथकाने ही कारवाई केली. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारमार्फत ही योजना राबविण्यात येते. सरकारी बँकांमार्फत यासाठी कर्ज पुरवठा केला जातो. याच्या समन्वयाची जबाबदारी खादी ग्रामोद्योग मंडळावर सोपविण्यात आली आहे. या घटनेमुळे या उपक्रमातील लाचखोरीवरही प्रकाश पडला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here