मुंबईः मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. राज्याचे उर्जामंत्री व काँग्रेस नेते यांनी आपल्याच सरकारविरुद्ध आवाज उठवला होता. आज पदोन्नती आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली असून या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे.

राज्य सरकारने गेल्या ७ मे रोजी पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जारी केलेला शासन निर्णय राज्यघटनेच्या तरतुदींचा भंग करणारा आहे. हा निर्णय मागे घ्यावा, अशी भूमिका नितीन राऊत यांनी घेतली होती. त्यानंतर पदोन्नती आरक्षणावरुन महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली असल्याची चर्चा होती. आज पदोन्नती आरक्षणासासंदर्भात मंत्री नितीन राऊत, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितित एक बैठक पार पडली. यावेळी बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच यावर तोडगा निघेल, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

‘पदोन्नती आरक्षणाबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यावर निश्चित तोडगा निघेल, अशी मला खात्री आहे. सरकारदेखील याबाबत सकारात्मक असून सर्वानीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळं काही अडचण येणार नाही,’ असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

‘७ मे रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशाबाबत चर्चा झाली असून सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी भूमिका मांडली, त्यावर सर्वांनी अभ्यास करायचं ठरवलं. कायदेशीरबाबी अनेक आहेत. प्रशासकीय बाबी आहेत. सकारात्मक निर्णय होईल,’ असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

‘तीन पक्षाचं सरकार आहे हे सर्वांना माहिती आहे आणि निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांना तो विषय समजावून सांगणे व त्यावर मार्गदर्शन घेणे. हे सर्व विषय त्यामध्ये असतात. आज आम्ही यावर सखोल चर्चा केली व सर्व बाबी समजून घेतल्या आहेत. आता केवळ निर्णयापर्यंत पोहचायचं आहे, दरम्यानच्या काळात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका कुणीतरी दाखल केलेली असून त्यामुळे थोडा पेच निर्माण झालेला आहे. यासंबंधी कायदेशीर अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here