: दुसऱ्या लाटेत करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी होण्यासाठी जिल्ह्यात 15 दिवस निर्बंधांची कडक अंमलबजावणी ( Strict Lockdown) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या सीमेवरील नाक्यांवर तपासणी आणखी कडक करण्यात येणार आहे. आरटीपीसीआर किंवा अँटिजन तपासणी अहवाल निगेटिव्ह असलेल्या व अत्यावश्यक कारण असणाऱ्या नागरिकांनाच जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे. हा अहवाल सोबत नसल्यास नाक्यालगत अँटिजन तपासणी करण्यात येणार असून निगेटिव्ह अहवाल असेल तरच जिल्ह्यात प्रवेश मिळेल, असा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करोना साखळी तोडण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याबाबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपायुक्त निखिल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोणते नियम लागू असणार?
सध्या जिल्ह्यात करोनाचा रुग्णदर व मृत्यूदर अधिक असून यावर नियंत्रण आणण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, घर अपुरे असल्यास घरातील एका बाधित व्यक्तीकडून कुटुंबातील अन्य सदस्य बाधित होत असल्याचे आढळून येत आहे. यासाठी बाधित रुग्णांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर द्या. फिरते विक्रेते, अत्यावश्यक सेवेंतर्गत कार्यरत दुकानदार व कामगार, औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार, मजूर यांची अँटिजन तपासणी करुन घ्या. तपासणीसाठी नकार देणाऱ्यांच्या विक्रीस बंदी घाला. नेमून दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त दुकाने सुरु असल्यास अशी दुकाने बंद करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.

महानगरपालिका व नगरपालिका हद्दीत रस्त्यांवर अनावश्यक कारणाने फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजन तपासणी करुन घ्या. रुग्णसंख्या अधिक प्रमाणात असणाऱ्या शिरोळ, हातकणंगले व करवीर या तीन तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रांत प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील रुग्णदर व मृत्यदर कमी होण्यासाठी सरपंच व ग्राम विकास अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करायला हवेत. तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी ग्रामसमित्या व प्रभाग समित्यांच्या बैठका घ्याव्यात. करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी गाव निहाय व प्रभाग निहाय सूक्ष्म नियोजन करुन प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, करोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांचा धोका लक्षात घेऊन लहान बालकांसाठी सोयी सुविधा निर्माण करायला हव्यात. हेल्पलाईनद्वारे नागरिकांना उपलब्ध बेडची माहिती तात्काळ मिळवून द्यावी. तसेच व्हेंटिलेटरयुक्त बेड वेळेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या लवकरात- लवकर कमी होण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असंही आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोविड सेंटरमधील रुग्णांच्या तब्बेतीच्या चढउतारावर लक्ष देऊन रुग्णांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात. शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिक देखील किरकोळ कारणासाठी बाहेर पडल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. फिरत्या पथकांमार्फत शहर व गावांमध्ये अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजन तपासणी करुन घ्यायला हवी. करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन केल्यास जिल्ह्याचा रुग्णदर कमी होईल, असा विश्वास यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी करोना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here