हवामान खात्याच्या मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ तासांत पुणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल तर ३० ते ४० किमी प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहतील असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या शहरांमध्ये ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. इतकंच नाहीतर रत्नागिरी बीड, लातूर, रायगड या जिल्ह्यांमध्येही पुढच्या तीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदाचा मान्सून विदर्भाला करणार खूश
अद्याप मान्सून केरळमध्ये पोहोचलेला नाही. मात्र, हवामान खात्याने मान्सूनचा एकंदरित अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार यंदा मान्सून काळात देशात सरासरीच्या १०१ टक्के तर विदर्भात १०६ टक्के पर्जन्यमानाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
यंदा मान्सून ३० मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, काही कारणांमुळे मान्सून आगमनाला उशीर झाला आहे. मान्सून ३ ते ४ जूनच्या आसपास केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही विदर्भात मृगाच्या दिवशी मान्सून दाखल होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट आहे.
१० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात
दरम्यान, मान्सून विभागाच्या म्हणण्यानुसार, १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मॉन्सून सामान्यच्या ९८ टक्के राहील, असा अंदाज आहे तर १५ मे रोजी भारतीय हवामान विभाग पावसाचा पुढचा अंदाज सांगणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
पावसाळ्याआधी शेतीची अनेक काम सुरू झाली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी धान्याची पेरणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा वेळेवर दाखल होणार मान्सून हा शेतकऱ्यांसाठीदेखील लाभदायक असणार आहे. भारतातील सुमारे २०० दशलक्ष शेतकरी धान्य, ऊस, मका, कापूस आणि सोयाबीन यासारख्या अनेक पिके पेरण्यासाठी मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करतात.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times