मुख्यमंत्र्यांनी परवाच आपल्या लाईव्ह संबोधनातून १२ वी तसेच अशा काही महत्त्वाच्या परीक्षांच्या आयोजनाच्या बाबतीत संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरून योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली होती. करोनाचा संसर्ग अजूनही वाढत असून दहावी व बारावीसारख्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पालकांकडूनही होत होती. मुख्यमंत्र्यांनीदेखील यासंदर्भात आपले म्हणणे मांडले होते. यानंतर केंद्र सरकारकडून सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
दरम्यान, राज्यातही दहावीच्या परीक्षा न घेता मुल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घेतला आहे.
राज्य बोर्ड बारावीच्या परीक्षेबाबत काय निर्णय घेणार?
महाराष्ट्र बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, मात्र बारावीबद्दल अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र केंद्राने बारावीच्या परीक्षा रद्द कऱण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातही तशाच हालचाली सुरू असल्याचे संकेत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.
‘करोनाची सध्याची परिस्थिती व मुलांवर याचा होणारा परिणाम तसेच परिक्षेच्या संभ्रमावस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात तणाव आहे. अशा परिस्थितीत परीक्षेऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा. केंद्र सरकारने देशपातळीवर याबाबत एकसुत्र धोरण निश्चित करावे ही मागणी महाराष्ट्र शासनाने केली होती. या मागण्यांचा विचार करून केंद्रसरकारने CBSE बारावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच स्वागतार्ह आहे. शैक्षणिक जीवनातील बारावी परीक्षा ही महत्त्वाची पायरी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. यापुढे महाराष्ट्र शासन देखील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांचे आरोग्य व हित जोपासून लवकरच निर्णय घेईल,’ अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times